‘बाबासाहेबांविषयक जे जलसे आम्ही करत असू, त्या जलशांच्या पैशांमधून ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ उभा राहिला..शिवाजी राजांच्या सैन्यात ज्या प्रमाणे बारा बलुतेदारांना स्थान होते, त्याप्रमाणे या नाटकासाठी गावातील सर्व मंडळी झटली. त्यांच्या कष्टावर हा शिवाजी उभा राहिला..मुंबईतील राहुल भंडारें, युवराज मोहिते यांसारख्या मंडळींनी केलेल्या सहकार्यामुळे शिवाजी उभा राहिला..’
या नाटकाने १०० प्रयोग पूर्ण करणे हे निर्माता, दिग्दर्शक, लेखक यांच्याप्रमाणे या मंडळींचे यश आहे.. मुंबई, पुण्याबाहेरील एक संस्था वादग्रस्त ठरावा असा विषय नाटकाव्दारे घेऊन येते. नाटकात ठिकठिकाणी जळजळीत वास्तव मांडणारे संवाद असूनही समाजातील कोणत्याही घटकाकडून विरोधाचा फारसा सामना न होता त्याचे १०० प्रयोग पूर्ण होतात. हेच मुळात सध्याच्या घडीला मोठे यश म्हणावे लागेल. या पाश्र्वभूमीवर नाटकाची संकल्पना, गीत व संगीत दिलेले लोकशाहीर संभाजी भगत यांनी नाटकाचा आतापर्यंतचा प्रवास, त्याचे यश याविषयी ‘लोकसत्ता’ कडे मत मांडले.
जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ या गावातील नाटय़वेडय़ा मंडळींचे हे नाटक आज मराठी नाटय़ क्षेत्रात चर्चेचा विषय झाले आहे ते त्याच्या नावामुळे आणि विषयामुळे. शिवाजी राजांचे गड, किल्ले, त्यांनी केलेल्या लढाया हे सर्वानाच माहीत आहे. राजांविषयी बहुतेक जण आपल्या लिखाणातून, पोवाडय़ांमधून हेच मांडत आले आहेत. परंतु आजपर्यंत जो शिवाजी उजेडात आला नाही किंवा जाणीवपूर्वक आणू देण्यात आला नाही, तो शिवाजी मांडण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचे भगत यांनी नमूद केले. शिवाजी हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा राजा होता. या नाटकाव्दारे शेतकऱ्यांच्या मुलांनी  तो रंगभूमीवर आणला आहे. हे नाटक रंगभूमीवर यावे, यासाठी शेतकऱ्यांची मोठी मदत झाली. शेतकऱ्यांनी अक्षरश: अन्नधान्याची मदत केली. एक उदाहरण सांगतो. आमच्या आंबेडकरी जलशाच्या कार्यक्रमांना कायम येणारी एक वृद्धा या नाटकाची तालीम सुरू झाल्यावरही भाकरी घेऊन येऊ लागली. ती एकदा म्हणाली, ‘काय रे, शिवाजी आणि भीमनगरचं काय आहे ते’ तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मग नाटक पाहिल्यावर मिळाले. या नाटकाच्या विषयाने माणसा-माणसांमधील सत्याला आवाज दिला आहे. शिवाजी हे समाज प्रबोधनाचे दुधारी अस्र आहे. त्याचा योग्य पद्धतीने वापर कसा करून घ्यावयास हवा ते आपण ठरविले पाहिजे, हे भगत यांनी यानिमित्त मांडले.
‘शिवाजी..’ रंगभूमीवर आणण्याआधी काही मान्यवरांनी त्याचा अनुभव घेतला. तेव्हा त्यांनी या नाटकात तर चार नाटक होतील, असे सांगत नाटक लहान करण्याची सूचना केली. नंदू माधव या नावाला सगळीकडेच ओळख असल्याने त्यांनी जेव्हा हे नाटक दिग्दर्शित करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सर्वानीच स्वागत केले. नंदू माधव कलाकारापेक्षाही एक उत्कृष्ट संकलक आहे. त्यांनीच मग नाटकातील फाफटपसारा कमी करून त्याचा आकार लहान केला. बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणारे जे जलसे आम्ही करत होतो, त्या जलशांमधून मिळालेला पैसा आम्ही या नाटकासाठी वापरला. म्हणजे सर्वसामान्यांचा पैसा योग्य ठिकाणी उपयोगात आणला. हे नाटक पाहणारी व्यक्ती कधीही, कोणत्याही आंदोलनात हाती दगड घेणार नाही, असा विश्वासही भगत यांनी व्यक्त केला. नाटक गावागावांत नेण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. नाटकाच्या यशात नंदू माधव यांच्यासह लेखक राजकुमार तांगडे, सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि वेगळा विषय असूनही प्रतिसाद देणाऱ्या प्रेक्षकांचा वाटा आहे. विशेषत: नाटकाच्या निवासी तालमी ही संकल्पना आता जवळपास मोडीत निघाली असताना सर्व कलाकारांनी त्यांचा वेळ नाटकासाठी दिला हे या नाटकाविषयीचे वेगळे वैशिष्टय़े असल्याचे भगत यांनी नमूद केले.