सोलापूर महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमहापौर प्रवीण डोंगरे व पक्षाचे गटनेते दिलीप कोल्हे यांच्यातील हाणामारी प्रकरणाची दखल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली असून त्यांनी याबाबतचा अहवाल शहराध्यक्ष मनोहर सपाटे यांच्याकडून मागविला आहे.
या प्रकरणाची दखल खरोखर घेतली गेल्यास यात आक्रमक असलेल्या एकटय़ा कोल्हे यांच्याविरूध्द कारवाई होणार की त्यांच्याबरोबर डोंगरे यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले उपमहापौर डोंगरे हे सुशिक्षित व आदर्श नगरसेवक म्हणून गणले जातात. तर कोल्हे हे ‘बाहुबली’ म्हणून सर्वपरिचित आहेत. महापालिकेत सर्वसाधारण सभेच्या पाश्र्वभूमीवर आयोजिलेल्या पक्षाच्या बैठकीत चक्क महिला नगरसेवकांच्या साक्षीने कोल्हे व डोंगरे यांच्यात शाब्दिक खडाजंगी होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. या घटनेमुळे पक्षाची प्रतिमा आणखी डागाळली गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच या घटनेनंतर लगेचच योगायोगाने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर येथील देवदर्शनाच्या निमित्ताने सोलापूरला आले होते. या भेटीत त्यांच्या कानावर कोल्हे व डोंगरे यांच्यातील हाणामारीचा प्रकार गेला. शहराध्यक्ष मनोहर सपाटे यांनी प्राथमिक माहिती दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत तटकरे यांनी याबाबतचा अहवाल सादर करण्यास सपाटे यांना सांगितले.
शहराध्यक्ष सपाटे यांनी यासंदर्भात बोलताना प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या आदेशानुसार कोल्हे व डोंगरे यांच्यातील वादावरील वस्तुनिष्ठ अहवाल प्रदेश पक्षश्रेष्ठींकडे सादर केला जाणार आहे. त्यासाठी दोघांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले जाणार असल्याचे सांगितले. अहवाल पाठविल्यानंतर पुढील कारवाई प्रदेश पक्षश्रेष्ठींकडून केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पक्षाच्या उमेदवारांची बैठक काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुंबईत घेतली होती. त्यावेळी सोलापुरातील तिन्ही पराभूत उमेदवारांनी पक्षाच्या विरोधात कारवाया केलेल्या मंडळींविरूध्द तक्रारी केल्या होत्या. त्यावर कारवाई प्रलंबित असतानाच आता पालिका गटनेते कोल्हे व उपमहापौर डोंगरे यांच्यात झालेल्या हाणामारी प्रकरणाची दखल पक्षश्रेष्ठींना घ्यावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.