दैनंदिन बोलण्यात मराठी भाषेचा वापर करते या कारणावरून मिरज तालुक्यातील बेडग गावच्या एका बापलेकीचा समाजाकडून छळ होत असल्याची घटना उघड झाली आहे. यातील मुलीच्या सासरच्या लोकांनी केलेल्या मारहाणीत मुलीचा गर्भपात झाला असून मुलीच्या वडिलांना जातपंचायतीने ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या साऱ्या अत्याचाराच्या विरोधात मुलीच्या पालकांनी न्यायालयात धाव घेतल्याने हा सारा प्रकार उघड झाला आहे.
ही व्यथा आहे शिवाजी रामचंद्र जाधव यांच्या कुटुंबाची. बेडग (ता. मिरज) येथे वास्तव्यास असलेल्या जाधव यांच्या गोसावी समाजाची सात ते आठ घरे आहेत. त्यांच्या मुलीचे लग्न मिरज इथे राहणाऱ्या त्यांच्याच समाजातील एका तरुणाबरोबर झाले. लग्नानंतर एका कार्यक्रमात जाधव यांनी समाजाची भाषा सोडत मराठी भाषेचा वापर केला. ही बाब समाजाच्या जातपंचायतीला खटकली. यातून वाद उत्पन्न झाला. यावर निर्णय घेण्यासाठी समाजातील पंचांची म्हणजेच ‘दैवा’ची तात्काळ बठक झाली. या जातपंचायतीने लगोलग मुलीच्या वडिलांना ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
दरम्यान, या घटनेनंतर काही दिवसांनी मुलीला मारहाण करण्यात आली. यामध्ये तिचा गर्भपातही झाल्याचे मुलीच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावताच समाजाच्या विरोधात गेला म्हणून मुलीला एकतर्फी सोडचिठ्ठी देण्यात आली. तसेच या मुलाचे दुसरीकडे लग्नही लावून देण्यात आले.
समाजाची ही बंधने शिथिल व्हावीत यासाठी जाधव यांनी पंचांकडे याचना केली. समाजाच्या भाषेऐवजी मराठी बोलल्याबद्दल माफीही मागितली. तरीदेखील या पंचायतीने त्यांना माफ न करताच समाजातून बहिष्कृत केल्याची तक्रार जाधव यांनी न्यायालयात दाखल केली आहे.