News Flash

३ मेनंतरच मासेमारी?

जमावबंदीमुळे सध्याच्या परिस्थितीत मासेमारी करणे अशक्य असल्याचे मच्छीमारांचे मत

(संग्रहित छायाचित्र)

जमावबंदीमुळे सध्याच्या परिस्थितीत मासेमारी करणे अशक्य असल्याचे मच्छीमारांचे मत

पालघर : केंद्र सरकारने मत्स्यव्यवसाय व मत्सव्यवसायाशी निगडीत उद्योगाना टाळेबंदी दरम्यान सुरू ठेवण्याचे परवानगी दिली असली तरी सध्याच्या परिस्थितीत जारी असलेल्या जमावबंदीचा आदेशामुळे मासेमारी करणे शक्य होणार नाही. त्यामुळे टाळेबंदी संपल्यानंतरच उर्वरित हंगामात मासेमारी सुरू करण्याबाबत मच्छीमार विचार करत आहेत.

दरम्यान, ठाणे व मुंबई भागातील पर्ससीन ट्रॉलर धारकांनी पालघर जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनाकरिता प्रसिद्ध असलेल्या सुवर्ण पट्टय़ात घुसखोरी केल्याची तक्रार स्थानिक मच्छीमारानी मत्स्यव्यवसाय विभागाकडे केली असून मत्स्य संवर्धनाच्या दृष्टीने संबंधित विभागाने कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या मागणी केली आहे.

केंद्र शासनाने अमलात आणलेल्या टाळेबंदी नंतर अनेक ठिकाणी बाजार बंद करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बोटीवरील खलाशांना स्वत:च्या आरोग्याची तसेच आपल्या कुटुंबीयांची चिंता लागल्याने त्यांनी आपापल्या घरी जाण्याचा निर्णय घेतलाय. परिणामी २०-२२ मार्चपासून पालघर जिल्ह्यातील मासेमारी पूर्णपणे बंद झाली आहे.

केंद्र शासनाने ४ एप्रिल रोजी काढलेल्या अधिसूचनेत मासेमारी व मत्स्य व्यवसायाची संबंधित उद्योगाना टाळेबंदीतून वगळण्याचे निर्णय घेतला. त्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून त्यासंदर्भात सूचित केले. मात्र सध्या जिल्ह्यामध्ये जमावबंदीचा आदेश लागू असून मासेमारी करण्यासाठी चार खलाशी घेऊन मासेमारी करण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रत्यक्षात पालघर जिल्ह्यातील अधिकतर बोटी या कव व दालदा पद्धतीने मासेमारी करीत असून अशा बोटींवर दहा ते पंधरा खलाशी कामावर असणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत मासेमारी करिता जाण्यास पालघर जिल्ह्यातील मच्छिमार अनुकूल नसल्याचे मच्छिमारांच्या राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

सध्या अनेक माशांचा प्रजननाचा काळ असून या हंगामात मासेमारी बंद राहिल्यास आगामी मासेमारी हंगामामध्ये त्याचे फलित दिसून येईल असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे ३ मे रोजी टाळेबंदी संपल्यानंतर खलाशांना बोटीवर येणास पाचारण करणे व नंतर पुन्हा मासेमारी व्यवसाय सुरू करणे याकरिता काही दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे उर्वरित हंगामात मासेमारीकरिता अवघ्या दोन-तीन आठवडय़ांचा अवधी मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामामध्ये मासेमारी बंद ठेवण्याचा अनेक मच्छीमार संस्था विचार करीत असल्याचे नरेंद्र पाटील पुढे म्हणाले.

दरम्यान, पालघर जिल्ह्यात मासेमारी बंद असताना मुंबई व ठाणे जिल्ह्यातील काही भागातील पर्ससीन पद्धतीने मासेमारी करणारे ट्रॉलर्स पालघर जिल्ह्याच्या समुद्री क्षेत्रांमध्ये मोठय़ा प्रमाणात वावर व घुसखोरी करत असल्याचे मच्छीमारांच्या निदर्शनास आले आहे.

गुजरातमध्ये अडकलेले २२५० खलाशी परतले

टाळेबंदीमुळे पालघर जिल्ह्यामधील तलासरी आणि डहाणू तालुक्यातील जवळपास ४ हजार ते ५ हजारांवर खलाशी गुजरात राज्यात वेगवेगळ्या भागात अनेक जेटीमध्ये अडकून पडले होते. त्यापैकी सोमवारी ३०७, मंगळवारी ८४४ आणि बुधवारी दुपारी १५ बोटींतून २२५० खलाशी डहाणू बंदरात उतरले. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना सेंट मेरी हायस्कूल येथे थांबवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अलगीकरणाचा शिक्का मारून त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे समजले.

रायगड जिल्ह्यात मासेमारी करण्यास निर्बंध

केंद्र शासनाने मासेमारी करण्यासाठी परवानगी दिल्याने रायगड जिल्ह्याच्या साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्ताने जिल्ह्यातील मच्छिमारांना मासेमारी करण्याबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बिगर यांत्रिकी आणि एक ते तीन सिलेंडर असलेल्या नौकांना सध्यस्थितीत परवानगी देण्याचे शक्य असल्याचे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे तांडेल सह चार अपेक्षा जास्ती खलाशी मासेमारी नौकांवर नेता येणार नसल्याचे निर्बंध व इतर संसर्ग टाळण्यासाठी असलेल्या उपायोजना करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 3:04 am

Web Title: fishing impossible in current lockdown situation says fishermen zws 70
Next Stories
1 बँकांच्या दारात वयोवृद्धांची गर्दी
2 पोलीस ठाण्यातून १५ लाखांचा गुटखा पळवला
3 अखेर १४ तासानंतर मृतांच्या नातेवाईकांची सुटका!
Just Now!
X