बुल़डाणा जिल्ह्यात आणखी एका रुग्णाचा करोना तपासणी अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. तर ३२ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एका पाच वर्षीय चिमुकलीने करोनावर मात केल्याने तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ३२ अहवाल निगेटिव्ह व एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल हा संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील १७ वर्षीय युवकाचा आहे. तो मुंबई येथून परत आला आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्येत वाढ झाली असून, आतापर्यंत एकूण ३७ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २६ करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात आठ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील पाच वर्षाच्या चिमुकल्याने करोनाशी चिवट झुंज दिली. मुंबई येथून गावाकडे आल्यानंतर करोनाबाधित आढळलेली ही मुलगी बुलडाणा येथे कोविड केअर केंद्रात दाखल होती. या चिमुकल्या मुलीने आज करोनावर मात करीत आज सर्वांना सुखद धक्का दिला. चिमुकली आनंदाच्या भावमुद्रेत केंद्राच्या बाहेर पडली व टाळ्या वाजवून उपस्थितांनी तिचे स्वागत केले. मलकापूर तालुक्यातून करोना हद्दपार झाला. नरवलेच्या चिमुकलीला केंद्र शासनाच्या नवीन निकषांनुसार कुठलेही करोनाचे लक्षणे आढळून न आल्यामुळे सुट्टी देण्यात आली. यानंतर घरी तिला विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. मुलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या हस्ते सुट्टीचे कागदपत्रे देऊन पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले. यावेळी वैद्याकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून चिमुकलीला आनंदाने निरोप दिला. रुग्णवाहिकेतून तिला घरी सोडण्यात आले.

करोनाचे ९०६ अहवाल निगेटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यातील आणखी १०५ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण ९०६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली.