संततधार पाऊस आणि पंचगंगा, कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन शहरांमध्ये मंगळवारी महापुराचा हाहाकार उडाला. या दोन्ही शहरांतून अनुक्रमे 51 हजार 785 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, आता राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच गोवा कोस्टगार्डचे हेलिकॉप्टरही कोल्हापुरात एअरलिफ्टिंगसाठी दाखल झाले आहे. तसेच एनडीआरएफची पथकेही या ठिकाणी बचावकार्यात मदत करत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. करवीर, शिरोळमधील आठ गावे पूरग्रस्त आहे. महिला, मुलं आणि आजारी व्यक्तींना प्राधान्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न करत असल्याची माहित मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दरम्यान, त्यांनी पूरग्रस्कांना तात्काळ मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूरग्रस्तांना पिण्याचे स्वच्छ पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेशही देण्यात आले असल्याचे ते म्हणआले. सांगलीतही पाण्याची पातळी वाढली होती. ती आता कमी होत चालली आहे. या ठिकाणच्या 11 हजार 443 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून सांगलीतील 204 गावांना पुराचा फटका बसला आहे. तसेच पुणे, पालघर या ठिकाणची परिस्थिती आता सुधारत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्व यंत्रणांच्या मी संपर्कात होतो. चंद्रकांत पाटीलही संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. ते लवकरच पूरपरिस्थितीची घटनास्थळी जाऊन माहिती घेतील, असेही त्यांनी सांगितले. पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच वाढीव मदतही देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

दरम्यान, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. लष्कर, नौदल आणि हवाईदलाची मदत घेतली जात आहे. आज (बुधवार) सकाळी सांगलीत मदत कार्यासाठी सैन्यदलाचे पथक दाखल झाले असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कोल्हापूरमध्ये गोवा कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टरसह एक पथक आणि नौदलाच्या दोन विशेष विमानातून २२ जणांचे पथक बोटीसह मदत कार्यासाठी दाखल झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

कोयना, चांदोलीसह विविध धरणांतून पाण्याचा मोठय़ा प्रमाणात विसर्ग होत असल्याने सांगलीला सोमवारपासूनच पुराचा वेढा पडला आहे. मंगळवारी पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आणि शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या गणेश मंदिर परिसरातील बाजारपेठेतही पाणी पोहोचले. टिळक चौक, हरभट रोड, मारुती रोड या मुख्य बाजारपेठेत तीन फुटांपेक्षा अधिक पाणी साचले. अनेक घरांमध्येही पाणी शिरल्याने सोमवारी रात्रीपासूनच मदतकार्य सुरू करण्यात आले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून अधिकचा विसर्ग करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्याशी संवाद साधून विसर्ग वाढविण्याबाबत चर्चा केली. त्यामुळे अलमट्टीतून विसर्ग वाढविण्यात आला असून पाण्याची पातळी खाली येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगितले.