६५ एकर जागेत वनीकरण विभागाकडून ३ हजार वृक्षांची लागवड

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पलतीरावरील ६५ एकर जागेत सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षारोपण केले आहे. जवळपास ३००० वृक्षांची लागवड केली असून सद्यस्थितीला अनेक झाडांना नवीन पालवी फुटू लागली आहे.ज्या ६५ एकर जागेत मोठ्या यात्राकालावधीत भाविक मोठ्या संख्येने जमतात तो परिसर आता वृक्षांचा मेळा भरलाय असेच चित्र आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने चंद्रभागा नदीच्या वाळवंटात तंबू,राहुटी,निवास,भोजन बनविणे आदी गोष्टींवर बंधन घातले आहे. त्यामुळे पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या निवासासाठी चंद्रभागा नदीच्या पलतारी ६५ एकर जागेत व्यव्यस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रशासन यात्रा कालावधीत मोकळी जागा,वीज,पाणी,वैद्यकीय सुविधा आदी सोयी देत आहेत. त्यामध्ये आता भर घालून संपूर्ण ६५एकर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे.

या ६५ एकरामध्ये जानेवारी महिन्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ३००० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यातील सर्वच झाडांना नवीन पालवी फुटून फुले येण्यास सुरूवात झाली असल्याने ६५ एकरात आता भक्तीच्या मळ्यासोबत विविध वृक्षांचा मेळा बहरणार आहे. येथील वातावरण आल्हादायक, स्वच्छ, सुंदर व निरोगी राहवे यासाठी येथे गुलमोहर, सप्तपर्णी, स्पायथोडीया, कदंब, कांचन, जारोळ, व्हायक्स, िनब, िपपळ, बकुल, पांढरा चापा, अपटा, रेंटरी, लाल लसोडा आदी विविध देशी विदेशी दहा ते बारा फूट असलेल्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यातील बहुतांश वृक्ष विशाखापट्टणम येथील राजमुंद्री व राज्यातील विविध नामांकित नर्सरीतून आणण्यात आले आहेत. येथील झाडांना उन्हाचा कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी खास खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे येत्या आषाढी यात्रे दरम्यान ६५ एकरावर भक्तांचा मेळ्यासह पाना फुलानी बहरलेल्या वृक्षांचा अनोखा व निर्सगरम्य मेळा या ठिकाणी पहावयास मिळणार आहे.

पांडुरंगाची सेवा

हवेच्या दिशेवर वृक्षांची लागवड करण्यात आली असून ६५ एकराच्या चारी बाजूने उंच व दाट सावली देणारी झाडे लावण्यात आली आहेत. सुरूवातीला डिसेंबर ते जानेवारी महिन्यात झाडांची लागवड सुरू झाल्यानंतर वनीकरण विभागाबाबत अनेकांनी आक्षेप घेत झाडे कशी जगणार, यांची जोपसना कोण करणार, याबाबत सवाल उपस्थित केले. परंतु झाडे जगवणे व ६५ एकर फुलविणे ही पांडुरंगाची सेवा असल्याचे मानत सामाजिक वनीकरण विभागाने रात्रीचा दिवस करून झाडांची जोपासना केली.  – के. एस. आहेर लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग