गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं वलय आहे. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांची मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन म्हणतात. आज (५ सप्टेंबर) ज्येष्ठा गौरींचं घरोघरी आगमन होत आहे. गौरी किंवा महालक्ष्मी बसवण्याचे प्रकार आणि पद्धत वेगवेगळी असली, तरी त्यात उत्साह मात्र सारखाच असतो. जाणून घेऊयात गौरी आगमनासाठीचा उत्तम मुहूर्त कोणता आहे…

गुरूवारी दिवसभर अनुराधा नक्षत्र असल्यामुळं कधीही गौरी आणता येतील, अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. ज्येष्ठा गौरींचं आगमन हे अनुराधा नक्षत्रावर होतं. चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचं पूजन होतं, तर चंद्र मूळ नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचं विसर्जन केलं जातं

गौरी आगमन म्हणजे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी येण्याचा हक्काचा दिवस. गौरी आगमनाच्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीची ओटी भरून पूजा केली जाते. शुक्रवारी दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळं गौरींचं पूजन दिवसभर करता येईल तर शनिवारी दिवसभर मूळ नक्षत्र असल्यामुळं दिवसभरात कधीही ज्येष्ठा गौरींचं विसर्जन करता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, पुरण, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. यादिवशी सवाष्ण आणि ब्राह्मण यांना जेवायला बोलवायचीही पद्धत आहे. या गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात येतात. संध्याकाळी नातेवाईक, शेजारी आणि मित्र-मैत्रिणींना हळदी-कुंकवासाठी आणि गौरींचे दर्शन घेण्यासाठी बोलविण्यात येते.