पुणे जिल्ह्यातील टेमघर धरण गळतीप्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अभियंत्यांना दणका दिला आहे. गळतीप्रकरणी १० अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून या सर्वांची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही गिरीश महाजन यांनी दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील टेमघर धरणात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरु होती. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने रानडे समितीची नेमणूक केली होती. या समितीने ३० जूनरोजी अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार कृष्णा खोरे महामंडळाचे सहायक अभियंता मकरंद विठ्ठल म्याकल यांनी कंत्राटदार आणि अधिकारी अशा ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता गुन्हे दाखल झाल्यावर गिरीश महाजन यांनी १० अधिका-यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. याप्रकरणात २५ अधिका-यांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील १५ अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या सेवेत असलेल्या १० अधिका-यांचे तातडीने निलंबन करत असल्याचे महाजन यांनी सांगितले.
टेमघर धरणाच्या बांधकामाला मार्च १९९७ मध्ये सुरुवात झाली. या धरणाचे बांधकाम २००१ पर्यंत ९८ टक्के पूर्ण झाले होते. त्या वेळी वन विभागाने या धरणाच्या कामाला हरकत घेतल्याने हे काम ८ वर्षे बंद झाले होते. त्यानंतर २००९ मध्ये धरणाच्या कामाला पुन्हा सुरुवात होऊन ते २०१० मध्ये पूर्ण झाले. मात्र अवघ्या काही वर्षातच धरणातून गळती सुरु झाल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.  बांधकामांच्या नित्कृष्ट दर्जामुळे टेमघर धरणात गळती झाल्याचे चौकशीतून समोर आले होते. सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर, बनावट दस्तावेज, फसवणूक, कट रचणे अशा विविध कलमांखाली  ३४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही अभियत्यांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज केला असून ८ सप्टेंबररोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे.