राज्यात दारुची मागणी घटल्याने उसाच्या मळीच्या निर्यातीवरची बंदी हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत २०१९-२० या वर्षीचे मळीचे उत्पादन आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशी विदेशी मद्य, इ.एन.ए. तसंच इथेनॉल निर्मिती असणाऱ्या मद्यार्कांवरही होण्याची शक्यता लक्षात घेऊन मळीच्या परराज्यात परदेशात निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र सध्याच्या घडीला मद्य, मद्यार्क मागणी व्यवहार कमी झाल्याने मळीच्या उपलब्धेत वाढ झाली. त्यामुळे मळीवरची निर्यातबंदी उठवण्यात आली आहे.

राज्यात सध्या उद्भवलेल्या कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे मद्य आणि मद्यार्क मागणी व्यवहार कमी झाले आहेत. मळीच्या उपलब्धेत त्यामुळे वाढ झाली आहे. त्यामुळे ३० सप्टेंबर २०२० पर्यंत जी निर्यातबंदी घालण्यात आली होती ती २७ जूनच्या शासन निर्णयाद्वारे तातडीच्या प्रभावाने उठवण्यात येते आहे असं शासनाच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

मळी निर्यातीच्या परवानगीवर केंद्रीयरित्या नियंत्रण ठेवण्यासाठी परराज्यात परदेशात मळी निर्यातीची परवानगी देण्याचे अधिकार आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांना देण्यात येत आहेत. याबाबत आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांनी सविस्तर कार्यप्रणाली निश्चित करुन मळी निर्यातदार घटकांना निर्यातीची परवानगी देण्याची दक्षता घ्यावी असंही या आदेशात म्हटलं आहे.