News Flash

साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरु होणार; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा

मुंबई : विशेष बैठकीत बोलताना अजित पवार.

साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण पुढील शैक्षणिक वर्षापासून हे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. मुंबईत गुरुवारी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात यासंदर्भात आयोजित विशेष बैठकीत पवार यांनी या सूचना दिल्या.

सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. जानेवारी २०१२ मध्ये साताऱ्यासाठी ४१९ कोटी खर्चाचे, १०० खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ५०० खाटांचे रुग्णालय मंजूर होऊनही पुढील कार्यवाही झाली नव्हती. साताऱ्याची गरज लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला, त्यानुसार आज बैठक झाली. बैठकीत, शहरालगतची कृष्णनगर येथील जलसंपदा विभागाची ६४ एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्याचा निर्णय झाला. बदल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील खावली गावातील ७० एकर शासकीय जागा जलसंपदा विभागाला हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

यासंबंधीचा प्रस्ताव उद्या (३ जुलै) नियामक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. तिथं मंजूर झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही याची मान्यता घेण्यात येणार आहे. यामुळे हा प्रश्न आता निकाली निघाला आहे.

नवीन जागेवर उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आणि परिसर हा पुढील शंभर वर्षांचा विचार करुन विकसित करावा. सर्वं बांधकामे कलात्मक, दर्जेदार असावीत. गरज पडल्यास नामवंत तज्ज्ञांचा सल्ला, मदत घ्यावी. इमारतीची कलात्मकता, उपयोगीता आणि दर्जात तडजोड करु नये. महाविद्यालयाबाहेरच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, रेल्वे स्टेशन व एसटी बांधकामे कलात्मक, दर्जेदार असावीत. तसेच येथून येणाऱ्या नागरिकांची सोय लक्षात घेऊन रस्त्यांची सुधारणा व्हावी, आदी सूचना यावेळी अजित पवार यांनी दिल्या.

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय ही सातारकरांची सर्वात मोठी गरज असून यासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही, असा विश्वास देताना जिल्ह्यातील उपलब्ध आरोग्य यंत्रणा उपयोगात आणून पुढील शैक्षणिक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे, असे निर्देश पवार यांनी बैठकीत दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 9:27 pm

Web Title: government medical college in satara will start next year ajit pawar expressed confidence aau 85
Next Stories
1 सुखद बातमी, राज्यात आत्तापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण बरे होऊन घरी
2 अकोल्यात आणखी तीन रुग्णांचा बळी, आत्तापर्यंत ८३ जणांचा मृत्यू
3 रायगड जिल्ह्यात करोनाचे २४७ नवे रुग्ण; दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X