कृषी विभागाच्या पुढाकाराने आयोजित तीन दिवसीय धान्य महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळाला. महोत्सवात १ कोटी ४ लाख रुपयांची उलाढाल झाली.
महोत्सवात ६४ स्टॉल होते. यात ३०० शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेले धान्य निवडून, पॅकिंग करून विक्रीस आणले होते. गारपिटीच्या पाश्र्वभूमीवर धान्य महोत्सवास प्रतिसाद कसा मिळतो, याबद्दल शंका होती. मात्र, कृषी विभागाने घेतलेल्या मेहनतीमुळे ग्राहक व शेतकरी या दोघांचाही चांगला सहभाग राहिला. उन्हाळय़ात वर्षभराच्या धान्याची खरेदी केली जाते. या वर्षी गारपिटीमुळे बाजारात चांगल्या दर्जाचे धान्य कमी प्रमाणात उपलब्ध झाले. त्यामुळे चोखंदळ ग्राहकांनी धान्य महोत्सवात धान्य खरेदी केली.
गव्हाच्या लोकवन, २१८९ व बन्सी या वाणांना चांगला प्रतिसाद मिळाला. अडीच हजार ते साडेचार हजार रुपये क्विंटल भाव गव्हाला मिळाला. सुमारे सोळाशे क्विंटल गव्हाची विक्री महोत्सवात झाली. रब्बी हंगामातील बडी ज्वारीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. दोन हजार २०० रुपयांपासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत ज्वारीचे भाव होते. सातशे क्विंटल ज्वारीची विक्री महोत्सवात झाली.
कृषी विभागाच्या वतीने दिलेल्या छोटय़ा दालमिलचा वापर करून शेतकऱ्यांनी तूर डाळ विक्रीस आणली होती. ३५ क्विंटल तूर डाळीची विक्री झाली. सेंद्रिय गुळालाही चांगला प्रतिसाद मिळाला. एका शेतकऱ्याने सात वर्षांपूवींचा जुना गूळ विक्रीस आणला होता. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने या गुळाची तपासणी करून त्याचे प्रमाणपत्रच त्यांनी लावले होते. भूईमूग शेंगाचीही चांगली विक्री झाली. याशिवाय लाल-हिरवी मिरची, कोबी, शेवग्याच्या शेंगा अशा भाजीपाल्याचीही चांगली विक्री झाली.
रसवंतीगृह स्टॉलमध्ये उसाच्या रसविक्रीतून एक लाख रुपये प्राप्ती झाली. कृषी विभागाने यंदाही शेतकऱ्यांना विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून दिले. उत्कृष्ट मांडणी, रचना व उत्तमोत्तम ग्राहकसेवा देऊन जास्तीत जास्त व्यवसाय करणाऱ्या गटांना या वेळी गौरवण्यात आले. लातूर तालुक्यातील िपप्रीअंबा येथील बळीराजा युवा कृषी मंडळ, किल्लारी येथील रावसाहेब पाटील शेतकरी गट व लातूर तालुक्यातील आर्वी येथील पार्वती महिला बचतगटास पहिले तीन क्रमांक देऊन गौरविले. सर्व शेतकऱ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
आत्माचे प्रकल्प संचालक सु. ल. बाविस्कर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी. एस. मोटे, मोहन भिसे, कृषी उपसंचालक पी. एन. ब्याळे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक आर. टी. मोरे आदींनी परिशम घेतले.