भंडारा, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांना आज (बुधवार) वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, मिरची, कांदा, हरभरा, आंबा पिकांचे प्रामुख्याने मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळाचा सामना करत असलेला शेतकरी गारपिटीमुळे अजून अडचणीत आला आहे. दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील धपकी येथे वीज कोसळून शेख सत्तार बबन शेख आणि देविदास कवडू सहारे यांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे ते झाडाखाली थांबले होते. त्याचवेळी वीज कोसळली आणि यात या दोघांचा होरपळून मृत्यू झाला.

बुधवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली या तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मोहाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारांचा पाऊस बरसला.