News Flash

किरीट सोमय्यांच्या आरोपांना हसन मुश्रीफ यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांना बिचाऱ्यांना काही माहिती नसावं!”

किरीट सोमय्या यांनी केलेल्या १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

hasan mushrif reaction on kirit somaiya allegations
हसन मुश्रीफ यांचं किरीट सोमय्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर

राज्य सरकारमधील मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. तसेच, यासाठी २७०० पानांचे पुरावे देखील सादर केल्याचं ते म्हणाले. त्यासंदर्भात आता हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. “किरीट सोमय्यांना बिचाऱ्यांना काही माहिती नसावं. ते कोल्हापूरला आले असते, तर त्यांना स्पष्टपणे खरी परिस्थिती समजली असती”, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. तसेच, किरीट सोमय्यांवर येत्या दोन आठवड्यांमध्ये १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं देखील मुश्रीफ यांनी यावेळी नमूद केलं.

“४ दिवस लोक नोटाच मोजत होते!”

हसन मुश्रीफ यांनी यावेळी कोल्हापूरमधील साखर कारखान्याविषयी किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं. “हजारो शेतकऱ्यांनी यामध्ये पैसे गुंतवले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना आपला कारखाना हवा होता. त्यावेळी सरकारने सहकारी कारखान्यांची नोंदणी बंद केली होती. म्हणून हा प्रायव्हेट लिमिटेड कारखाना काढावा लागला. ज्या दिवशी आम्हाला परवाना मिळाला आणि आवाहन केलं, तेव्हा एकाच दिवशी १७ कोटी रुपये जमा झाले. ४ दिवस लोक नोटा मोजत होते. कारण सगळ्या शेतकऱ्यांना ५, १०, ५० रुपयांच्या देखील नोटा दिल्या होत्या. त्यानंतर हजारो लोकांनी पैसे दिले. त्याची देखील कोल्हापूरच्या आयकर विभागाकडून तपासणी झाली. हजारो शेतकऱ्यांची चौकशी झाली. बँकांची पासबुकं देखील तपासली. त्यानंतर देखील हे पैसे आले”, असं मुश्रीफ म्हणाले.

“सोमय्यांना काहीही माहिती नाही”

“त्या कारखान्यासाठी आम्ही भागभांडवल गोळा केलं, राष्ट्रीयीकृत बँकांच्या वतीने पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, महाराष्ट्र बँक अशा अनेक बँकांच्या मदतीने हा कारखाना उभा केला. त्याची कर्जफेड देखील झाली आहे. आता नववा हंगाम आला आहे. याची काहीही माहिती किरीट सोमय्या यांना नाही”, असं मुश्रीफ म्हणाले.

मी १७ वर्ष राज्यात मंत्री आहे…

“राजकारणात, समाजकारणात आपली प्रतिमा तयार करण्यासाठी अनेक वर्ष घालवावे लागतात, कष्ट करावे लागतात. पण तिला कुणीही यावं आणि डाग लावावा ही परिस्थिती आली. माझ्यावर आधी असे आरोप झाले, तेव्हा मी मानहानीचे दावे ठोकले आहेत. आता हा सातवा दावा. वास्तविक माझ्यावर लोकांचा विश्वास आहे, त्याला तडा जाऊ नये यासाठी हे मी करतोय. मी १७ वर्ष या राज्यात मंत्री आहे. माझ्यावर एक साधा आरोप झाला नाही, चौकशी झाली नाही, कुणी चर्चा केली नाही. भाजपाच्या काळात चिक्की घोटाळा, मुंबईचा गृहनिर्माण घोटाळा असे घोटाळे या काळात झाले नाहीत. माझ्यावर तर कधीच आरोप झाले नाहीत”, असं मुश्रीफ यांनी यावेळी नमूद केलं.

किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा दावा ठोकणार

“येत्या २ आठवड्यांत किरीट सोमय्यांवर फौजदारी अब्रू नुकसानीचा १०० कोटींचा दावा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात करत आहे. जेव्हा ते तारखेला येतील, तेव्हा त्यांनी माहिती घ्यावी. मग त्यांच्या लक्षात येईल की भाजपा कोल्हापूरमधून सपाट झाला आहे. पुढील १० वर्ष देखील भाजपाला स्थान नाही. चंद्रकांत पाटील यांनी देखील हायब्रिड अॅन्युइटी बांधकामात जो भ्रष्टाचार केला आहे त्यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार करणार आहे”, असं देखील हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. माझ्यावरील आरोप हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी सोमय्या यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केले आहेत. पाटील आणि घाटगे यांचा योग्य वेळी समाचार घेऊ, असा इशाराही मुश्रीफ यांनी यावेळी दिला.

१२७ कोटींचा भ्रष्टाचार आणि २७०० पानी पुरावे! किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ!

“..३ महिन्यांत १०० कोटी जमवून दाखवतो”

दरम्यान, यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांना कारखान्यासाठी ३ महिन्यांत १०० कोटी जमा करून दाखवतो, असं आव्हानच दिलं आहे. “मला माझ्या कारखान्याचं एक्सपान्शन करायचं आहे. त्यासाठी १०० कोटी लागणार आहेत. १० हजार टनांचा कारखाना करायचा आहे. ५० मेगावॅट वीजनिर्मिती करायची आहे. मी किरीट सोमय्यांना सांगतो, की १५ दिवसांत लोक हातानं ५० कोटी आणून देतील. ३ महिन्यांत मी १०० कोटी जमवतो. लोकांचा एवढा विश्वास संपादन केलाय”, असं मुश्रीफ म्हणाले.

“सोमय्यांमुळे भाजपाची प्रतिमा मलीन होतेय”

किरीट सोमय्या यांच्या अशा वक्तव्यांमुळे भाजपाची प्रतिमा मलीन होत असून भाजपाच्या आगामी पराभवासाठी देखील सोमय्याच जबाबदार असतील, असं मुश्रीफ म्हणाले आहेत. “सोमय्यांनी अजूनही माहिती घ्यावी. पण विनाकारण भाजपाची प्रतिमा मलीन होईल, असं वक्तव्य करू नका. विधानसभा निवडणुकांदरम्यान माझ्यावर छापा टाकला. पण त्यानंतर कोल्हापूरमधून भाजपा साफ झाली. अलिकडच्या काळात देखील तेच घडलं. जेव्हा असा त्रास दिला जातो, तेव्हा लोक चवताळून उठतात. भाजपाच्या आगामी पराभवाला देखील किरीट सोमय्या हेच जबाबदार ठरतील. पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल, तेव्हा मी स्वत: किरीट सोमय्यांना हार घालीन”, असं मुश्रीफ म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 2:26 pm

Web Title: hasan mushrif reacts on kirit somaiya allegations of money laundering corruption pmw 88
Next Stories
1 १२७ कोटींचा भ्रष्टाचार आणि २७०० पानी पुरावे! किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ!
2 “ओबीसी विरुद्ध ओबीसी अशाच निवडणुका होणार”; वडेट्टीवारांनी दिले संकेत
3 “नारायण राणेंचं केंद्रात वजन आणि त्यामुळे…”; चिपी विमानतळावरुन निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका
Just Now!
X