News Flash

“चंद्रकांत पाटलांना विनंती करतो, तात्काळ चौकशी करा”, जरंडेश्वर कारखाना प्रकरणी हसन मुश्रीफांची मागणी!

जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी तातडीने चौकशी करण्यात यावी, असं विनंतीवजा आव्हान हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे.

हसन मुश्रीफांचं चंद्रकांत पाटलांना आव्हान

साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना ईडीनं जप्त केल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून अशा एकूण ३० कारखान्यांची यादीच पाठवली आहे. त्यावरून हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना विनंतीवजा आव्हान दिलं आहे की त्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करायला हवी. त्यासोबतच, साखर कारखाने तोट्यात घालणाऱ्या संचालकांची चौकशी लावावी, अशी मागणी देखील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

जरंडेश्वर प्रकरणानंतर भाजपा आक्रमक; अमित शाहांना दिली घोटाळा झालेल्या ३० कारखान्यांची यादी

नाईलाजाने कारखाने विकावे लागतात

यावेळी हसन मुश्रीफ यांनी कारखान्यांची आर्थिक स्थिती सांगितली आहे. “महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या थकबाकीत गेलेल्या आणि एनपीएत गेलेल्या साखर कारखान्याची विक्री आणि घोटाळे याबाबत ईडीच्या चौकशीबाबत माझं स्पष्ट मत असं आहे की, साखर कारखाने तोट्यात आल्यामुळे द्यावी लागणारी एफआरपी आणि त्याचा खर्च यामध्ये टनाला तीनशे ते चारशे रुपयांची असणारी तूट लक्षात घेता, कोट्यावधी रुपयांच्या अडचणीत साखर कारखाने आले आहेत. त्यामुळे बँकेची मुद्दल आणि व्याज थकल्यामुळे बँकांचे एनपीए वाढते. शेवटी नाईलाजाने बँकांना साखर कारखाने विकल्याशिवाय पर्याय उरत नसतो”, असं ते म्हणाले.

“शरद पवारांनी केंद्राला कोणताही सल्ला दिलेला नाही; जनतेची दिशाभूल करण्यात आली”

राजकारणासाठी ED ची चौकशी

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या चौकशीमागे राजकारण असल्याचा आरोप केला. “महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जे कारखाने विकले आहेत त्याची किंमत काढून प्रसिद्धी माध्यमातून निविदा काढून ज्यांची जास्त बोली आलेली आहे, त्यांनाच हे कारखाने विकले गेले आहेत. असं असताना केवळ राजकारण म्हणून यामध्ये ईडीची चौकशी केली गेली. आता यावर चंद्रकांतदादा पाटील म्हणतायेत की अमित शहा यांना पत्र लिहून विक्री झालेल्या म्हणजेच सर्व ५४ कारखान्यांची चौकशी लावणार. मी चंद्रकांतदादांना विनंती करेन की त्यांनी तात्काळ विनाविलंब चौकशी लावावी”, असं विनंतीवजा आव्हान त्यांनी यावेळी दिलं.

अनिल देशमुख यांना पुन्हा ED चं समन्स; यावेळी त्यांच्या मुलाचंही नाव!

संचालकांची चौकशी व्हावी

हसन मुश्रीफ यांनी कारखाने तोट्यात घालणाऱ्या संचालक मंडळाची देखील चौकशी करण्याची मागणी केली. “याचे दूध का दूध, पानी का पानी यापूर्वीच झालेले आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी झालेली आहे. माजी न्यायाधीशांनी देखील चौकशी केलेली आहे. त्यामध्ये कोणताही घोटाळा झालेले सिद्ध झालेले नाही. माझी आपणास आजही विनंती आहे की ज्या कारखान्यांच्या संचालकांनी कारखाने तोट्यात घातले त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. बँकेकडून व्हॅल्युएशन आणि लिलाव प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडलेली आहे”, असं देखील हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 10:39 pm

Web Title: hasan mushrif to chandrakant patil demands quick inquiry of jarandeshwar sakhar karkhana case pmw 88
Next Stories
1 “राफेलचं सत्य जनतेसमोर यायला हवं, नाहीतर…”, बाळासाहेब थोरांताची परखड टीका
2 “शरद पवारांनी केंद्राला कोणताही सल्ला दिलेला नाही; जनतेची दिशाभूल करण्यात आली”
3 जरंडेश्वर प्रकरणानंतर भाजपा आक्रमक; अमित शाहांना दिली घोटाळा झालेल्या ३० कारखान्यांची यादी
Just Now!
X