News Flash

‘सापुताऱ्यापेक्षा हतगड पर्यटनात सरस ठरेल’

राज्य शासनाचा पर्यटन विभाग तसेच आदिवासी पर्यटन विकास योजनेतून हतगड परिसरात भव्य पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार

| November 6, 2013 04:11 am

राज्य शासनाचा पर्यटन विभाग तसेच आदिवासी पर्यटन विकास योजनेतून हतगड परिसरात भव्य पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार असून, हे स्थळ सापुताऱ्यापेक्षा सरस ठरेल असा आशावाद पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. तालुक्यातील पालखेड धरणाजवळ कादवा नदीवरील पुलाचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पालखेड धरणाजवळील पुलामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असून, दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. या पुलामुळे दिंडोरीच्या विकासाला चालना मिळू शकेल, असेही भुजबळ यांनी नमूद केले. अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड होते. गेल्या वर्षी दोन नोव्हेंबर रोजी कादवा कारखान्याच्या गळीत हंगामाच्या दिवशी या पुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती. त्यावेळी भुजबळ यांनी पुढील गळीतापूर्वी काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची एक दिवस आधीच पूर्तता करण्यात आली. तालुक्यात तीन वर्षांमध्ये विविध पूल, रस्त्यांची कामे करण्यात आली असून सुमारे ८० किलोमीटर रस्ते डांबरीकरण करण्यात आले असून सिंहस्थ निधीतून म्हसरूळ-शिवनई, जानोरी-दिंडोरी, सापुतारा-वणी-पिंपळगाव या रस्त्यांच्या सुमारे ५० कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच या कामांना सुरूवात करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तालुक्यात विविध तीर्थक्षेत्रांना निधी देण्यात आला असून आदा आदिवासी भागाचा पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्राज्या सीमेजवळ असलेल्या गुजरातमधील सापुतारा पर्यटन केंद्रापेक्षा महाराष्ट्रातील हतगड येथे पर्यटनाच्या विकासाला अधिक वाव असून शासनाच्या पर्यटन विभागातर्फे हतगड किल्ल्याचा विकास करण्यात येत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी दिंडोरीत एक कोटीच्या सांस्कृतिक सभागृहाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती दिली. या सभागृहाचे कामही वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. धनराज महाले, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी विविध समस्या मांडल्या.
छाया: दिंडोरी तालुक्यातील पालखेडजवळील कादवा नदीवरील पुलाच्या उद्घाटनानंतर ऊस वाहतूक करणाऱ्या मालमोटारीला झेंडा दाखविताना पालक मंत्री छगन भुजबळ. या वेळी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 4:11 am

Web Title: hatgad will stand better than saputara for tourism chhagan bhujbal
Next Stories
1 पुण्याच्या‘भरत नाटय़ मंदिर’ला सांगलीचा देवल पुरस्कार
2 आदिवासी भागांमध्ये सुविधांबाबत वाढती विषमता
3 आंबा उत्पादकांसाठी पीक विमा योजना लागू
Just Now!
X