महाराष्ट्रात एप्रिलनंतर सरकार पाडण्यासाठी ‘ऑपरेशन’ राबवणार असल्याचे सांगितले जाते. उद्या कशाला, आजच महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा, असे थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. शनिवारी येथील मुक्ताईनगर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले.

ज्यांच्यासोबत २५ वर्ष होतो, त्यांनी कधी विश्वास दाखवला नाही. ज्यांच्याविरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवल्याचे ते म्हणाले. प्रशासन मला कळत नाही, अशी विरोधक टीका करतात. त्याचा फार फरक पडत नाही. जनतेची कामे झाली आणि होत आहेत, हे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारी आपण स्वीकारली नाही तर हे होणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले होते. म्हणून आपण ती जबाबदारी स्वीकारल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. मुक्ताईनगर आज मुक्त झाले आहे. कशापासून, कुणापासून हे तुम्हाला ठाऊक आहे, असा टोला ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांचा नामोल्लेख टाळून लगावला. दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा सरकारचा पहिला निर्णय ही माझ्या कारकीर्दीची सुरुवात होती. आता दोन लाखांच्यावर कर्ज आणि नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून मुक्त करीत शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

ज्यांच्यासोबत २५ वर्ष होतो, त्यांनी कधी विश्वास दाखवला नाही. ज्यांच्याविरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला. प्रशासन मला कळत नाही अशी माझ्यावर टीका होते. त्याने फार फरक पडत नाही. जनतेची कामे होत आहेत, हे महत्त्वाचे.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री