जुलैच्या पहिल्या आठवडय़ात सर्वदूर सरींचा अंदाज

पुणे : बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला सर्वदूर पावसाची शक्यता आहे. सद्य:स्थितीत पुढील दोन ते तीन दिवस कोकणात मुसळधार, तर मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुरुवारी (२७ जून) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला.

सध्या राज्यात ठरावीक ठिकाणी पावसाची हजेरी आहे. काही दुष्काळी भागामध्ये पाऊस हजेरी लावत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या सर्वच भागासह घाटमाथ्यावर चांगला पाऊस बरसण्याची चिन्हे आहेत.

कोकणात आजही मुसळधार..

गुरुवारी (२७ जून) पुणे शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, मालेगाव, नाशिक येथे पाऊस झाला. वाई, महाबळेश्वर, पाचगणी या भागात सकाळपासूनच संततधार होती. कोकणात रत्नागिरी</p>

जिल्ह्य़ात विविध ठिकाणी आणि अलिबाग येथे पावसाची नोंद झाली. २९ जूनला कोकणामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

रत्नागिरीला झोडपले..

मुसळधार पावसाने गुरूवारी रत्नागिरी शहर आणि परिसराला झोडपले. २४ तासांत तालुक्यात तब्बल १३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.  २४ तासात  राजापूर (८४ मिमी), चिपळूण (५५ मिमी)  दापोली (४२मिमी) आणि  संगमेश्वर (३५मिमी) या चार तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडला.

पाऊसभान..

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी राज्य व्यापले असले, तरी अनेक भागात अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मोसमी वाऱ्यांचे प्रवाह कमजोर आहेत. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हे प्रवाह बळकट होऊन राज्यात जुलैच्या आरंभ चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.