कोयना क्षेत्रातील पावसाचा जोर आज काहीसा वाढला असून, धरणाची पाणीपातळी साडेचार फुटाने तर, पाणीसाठा ५ टीएमसीने वाढला आहे. कृष्णा, कोयनाकाठची संततधार ओसरली आहे. गेल्या ४ दिवसांतील पावसाने जवळपास सर्वच जलसिंचन प्रकल्पांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
कोयनेच्या पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, धरणात गेल्या ३६ तासांत सुमारे ५ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. कोयना जलाशयाची पातळी २,०९१.७ इंच असून, पाणीसाठा ४० टीएमसीच्या जवळपास आहे. कालपासून कोयना धरणक्षेत्रात सरासरी सुमारे १९५ तर एकूण १०२३ मि.मी. पावसाची नोंद आहे. त्यात पाथरपूंजला सर्वाधिक १२१७ मि.मी. एकूण पाऊस झाला आहे. पाठोपाठ महाबळेश्वरला ९६४, नवजाला ९४४, कोयनानगरला ७३४ तर प्रतापगडला ७९४ मि.मी. पावसाची नोंद आहे.