अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे रत्नागिरीच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असून सोमवारी रात्री उशीरा शहर आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरीही पडल्या.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यत अनेक ठिकाणी ढगाळ हवामान असून नोव्हेंबर महिना संपला तरी थंडीचा मागमूसही नाही. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या दोन दिवसांत या पट्टय़ाचे चक्री वादळात रूपांतर होईल, असाही इशारा वेधशाळेने दिला आहे. हे वादळ वायव्य दिशेने जाणार असल्याने कोकणच्या किनारपट्टीला त्याचा थेट फटका बसणार नाही. पण समुद्रात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाचे वारे वाहतील, असा इशारा देण्यात आला आहे.   त्यानुसार सोमवारी संध्याकाळपासूनच प्रभाव जाणवू लागला असून रात्रभर त्याचा प्रभाव टिकून होता.

मंगळवारी दिवसा तो फार जाणवला नाही. तसेच पाऊसही पडला नाही. पण अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम होते. आणखी सुमारे दोन ते तीन दिवस हे वातावरण कायम राहील, असेही हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आधीच अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट होणार असलेल्या आंबा आणि काजूच्या हंगामावर या बदलत्या हवामानामुळे जास्त गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.