नंदुरबारमध्ये तापमान घसरल्याने थंडीची लाट पसरली आहे. जिल्ह्यात पारा वेगाने घसरल्याने लोकांना हुडहुडी भरली आहे. थंडी वाढल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नंदुरबारमधील सातपुडा पर्वतरांगा आणि आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात थंड वारे वेगाने वाहत आहेत.
नंदुरबारमधील अक्कलकुवा भागातील डाब येथे ठिकठिकाणी दवबिंदू गोठले आहेत. याठिकाणी हवामान विभागाचे शासकीय कार्यालय नसल्याने तापमान मोजण्याचे कोणतेही यंत्र नाही. त्यामुळे या भागातील नेमके तापमान मोजता आलेले नाही. मात्र तज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजावरुन नंदूरबारमधील तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअस इतके आहे. वाढलेल्या थंडीमुळे सातपुडा परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढली असली तरी स्थानिकांना या थंडीचा फटका बसला आहे. ठिकठिकाणी शेकोटी पेटवून नागरिक ऊब मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2017 5:17 pm