News Flash

वसई-विरार पालिकेकडून करोनाबळींची लपवाछपवी

१३ दिवसांत २०१ मृत्यू, नोंद केवळ २३

(संग्रहित छायाचित्र)

सुहास बिरहाडे/प्रसेनजीत इंगळे

वसई- विरार महापालिका करोनाबळी लपवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरात गेल्या १३ दिवसांत २०१ रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, पालिकेने केवळ २३ मृत्यूंची नोंद केली. चालू वर्षात जानेवारी ते १३ एप्रिलपर्यंत करोनाने २९५ जणांचा बळी घेतला असताना पालिकेने केवळ ५२ मृत्यूंची नोंद केली. म्हणजेच या वर्षात आतापर्यंत पालिकेने २४३ करोनाबळी लपल्याचे स्पष्ट झाले आहे.

वसई- विरारमध्ये करोनाने हाहाकार उडवला आहे. तिथे दररोज सरासरी ६०० ते ७०० रुग्ण आढळतात. पालिकेतर्फे रोज करोनाचा दैनंदिन अहवाल सादर केला जातो. त्यात शहरातील करोना मृत्यूचे आकडे केवळ १ आणि ० असेच नोंदवले जात होते. याबाबत अधिक माहिती घेतली असता धक्कादायक वास्तव समोर आले. चालू महिन्यात १ एप्रिल ते १३ एप्रिलपर्यंत शहरात तब्बल २०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, पालिकेने केवळ २३ मृत्यू दाखवले आहेत.

मंगळवार १३ एप्रिल रोजी शहरात एकाच दिवसात तब्बल ३६ रुग्णांचा मृत्यू झाला असताना पालिकेने दैनंदिन करोना अहवालात केवळ ३ मृत्यूंची नोंद केली.

चालू वर्षात जानेवारी ते एप्रिल (१३ एप्रिलपर्यंत) शहरात एकूण २९५ रुग्ण दगावले. मात्र, पालिकेने केवळ ५२ रुग्णांची नोंद दाखवली आहे. म्हणजेच पालिकेने गेल्या सव्वा तीन महिन्यांतील २४३ करोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू लपवले.

खरे आकडे उघड

सोमवारी (१२ एप्रिल) शहरात करोनामुळे ११ मृत्यू झाले होते. त्यात एका खासगी रुग्णालयातील ७ रुग्णांचा समावेश होता. मात्र, पालिकेने केवळ २ रुग्ण दगावल्याची नोंद दैंनदिन अहवालात केली होती. त्यामुळे पालिका करोना रुग्णांचे मृत्यू लपवत असल्याचा संशय येऊ लागला. शहरात मान्यता असलेली १० खासगी करोना रुग्णालये आहेत, तर पालिकेची २ करोना केंद्रे आहेत. करोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह पालिकेकडे सोपविण्यात येतो. त्यासोबत करोना झाल्याचे प्रमाणपत्र असते. करोनाने मृत्यू झालेल्यांचा अंत्यविधी पालिकेच्या ४ स्मशानभूमी आणि एका दफनभूमीत करण्यात येते. त्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. किती मृतदेहांवर अंत्यसंसस्कार झाले त्याची अधिकृत आकडेवारी पालिकेकडे आहे. ही यादी तपासली असता पालिकेने सव्वातीन महिन्यात २४३ करोनाबाधीत रुग्णांचे मृत्यू लपविल्याचे उघड झाले.

शहरातील खासगी रुग्णालयांत मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंद पालिकेच्या दैनंदिन अहवालात केली जात नव्हती. या अहवालात केवळ पालिका रुग्णालयांतील मृतांच्या आकड्यांची नोंद होते. मात्र, यापुढे खासगी रुग्णालयांतील मृतांची नोंदही अहवालात करण्यात येईल.

– गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार शहर महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 12:52 am

Web Title: hide corona victims from vasai virar municipality abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सोलापुरात अवघ्या दहा टक्के रुग्णांनाच ‘रेमडेसिविर’
2 पालघरमध्ये रुग्णवाहिकांची कमतरता
3 प्राणवायूचा पुरवठा सुरळीत
Just Now!
X