पुणेकर काय करतील याचा नेम नाही असा टोमणा अनेकदा मारला जातो. मात्र मस्करीचा भाग वगळल्यास खरोखरच एका पुणेकरांने जॅक लावून आपले घर चार फुटांपर्यंत उंच करण्याचा खटाटोप सुरु केला आहे. हो म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जॅक लावून गाडीचे टायर बदलल्याचे ऐकले असेल मात्र पुण्यात जॅक लावून चक्क घरच उलचले आहे. आणि हा पुणेकर आहे हडपसर येथील शिवकुमार अय्यर.

१८ वर्षांपूर्वी हडपसरमधील तारदत्त कॉलीनी येथे अय्यर यांनी भारद्वाज नावाचा बंगला बांधला. मागील अनेक वर्षांपासून या बंगल्यासमोरील रस्त्याची उंची हळूहळू वाढत गेली. त्यामुळेच या घरामध्ये पावसाचं पाणी साठू लागलं. म्हणूनच अय्यर कुटुंबाने यावर उपाय शोधण्याच्या दृष्टीने परदेशात वापरली जाणारी हाऊस लिफ्टिंग तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे ठरवले. आणि दीड महिन्यापूर्वी बंगल्याची उंची चार फुटांनी वाढवण्यासाठी काम सुरु झाले. हे काम करण्यासाठी १० ते १२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून पुन्हा संपूर्ण बंगला पाडून तो बांधण्याऐवजी हा खर्च खूपच कमी असल्याने अय्यर कुटुंबाने हाऊस लिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. सध्या हा दोन हजार स्केअर फुटांचा बंगला अडीचशे जॅक्सवर उभा असून अनेक स्थानिक या बंगल्याचे काम पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

याबद्दल बोलताना बंगल्याचे मालक शिवकुमार म्हणाले की, ‘पावसाळ्यात घरात पाणी साठायचे. या घरात सध्या कोणी राहत नसले तरी मागील काही वर्षांपासून पाणी साठण्याचा हा प्रकार त्रासदायक ठरत होता. म्हणून यावर काय उपाय करता येईल यासंदर्भात गुगलवर सर्च केले असता आम्हाला हाऊस लिफ्टिंगच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळाली. हरियाणातील एका कंपनी आम्ही हे काम दिले असून आत्ता आहे त्यापेक्षा घराची उंची चार फुटांने वाढवण्यात येणार आहे.’

हाऊस लिफ्टींग म्हणजे नक्की काय?

घराची उंची वाढवण्यासाठी हाऊस लिफ्टींगचे तंत्रज्ञान जगभरात वापरले जाते. घराची उंची कमी असल्याने घरात पाणी साठणे, घराचा पाया मजबुत करणे यासारख्या कारणांसाठी या तंत्रज्ञानाच्या मदतीने घराच्या पायाची पुर्नबांधणी केली जाते किंवा पायाची उंची वाढवली जाते. हाऊस लिफ्टींगचे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घराची उंची एक फुटापासून ते १५ फुटापर्यंत वाढवता येते. घर किंवा बंगला पाडून पुन्हा बांधण्याच्या एकूण खर्चाच्या केवळ ३० टक्के खर्चात हाऊस लिफ्टींग करता येते.

हाऊस लिफ्टींगनंतर घराला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. घराचा मुळ साचा किंवा भिंतींना कोणताही धोका या तंत्रज्ञानामुळे नसतो अशी माहिती अय्यर यांच्या बंगल्याचे काम करणाऱ्या सिसोदिया यांनी सांगितले. सिसोदिया यांची कंपनी १९९१ पासून या क्षेत्रात काम करते. त्यांच्या सांगण्यानुसार भारतामध्ये उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली, पंजाबमध्ये हे तंत्रज्ञान अनेकजण वापरतात. मात्र पुण्यामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारचा प्रयोग केला जात आहे.