नियमांना बगल देणे ही माझी सवयच आहे असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. शरद पवारांचे हे वक्तव्य ऐकताच सभागृहात एकच हशा पिकला. पुण्यात झिपऱ्या या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी शरद पवार आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आणि सिंहासन या सिनेमाचा किस्साही सांगितला.  सिंहासन हा मराठीतला गाजलेला राजकीय चित्रपट आहे. या सिनेमाची कथा अरूण साधू यांच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या दोन पुस्तकांवर बेतलेली आहे. या सिनेमाचे शूटिंग मुख्यमंत्री कार्यालय आणि निवासस्थान या ठिकाणी करण्याचे जब्बार पटेल आणि अरूण साधू यांनी ठरवले.

तशी विनंती आणि परवानगी काढण्यासाठी माझ्याकडे ते आले. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो, आमच्या जनरल अॅडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटने हे कसे अयोग्य आहे ते मला सांगितले. एवढेच नाही तर मला एक पानभरून नोटही पाठवली. मात्र नियमांना बगल देण्याची माझी सवयच असल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केले. शरद पवारांनी हे वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या गाजलेल्या झिपऱ्या कादंबरीवर आधारित अश्विनी रणजीत दरेकर प्रस्तुत झिपऱ्या मराठी चित्रपट माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये खास शो चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रतिभा पवार,राज्यसभा खासदार कुमार केतकर,जब्बार पटेल आणि मधुकर पिचड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की,अरुण साधू नी जे लिहिले ते मराठी व्यक्तीच्या मनाला भिडणारे आहे..त्यांनी विशेषत मुंबईनगरी वर देखील त्यांनी लिखाण केले आहे.ज्या प्रकारे मुंबई चा उल्लेख केला.या मुंबईनगरी देशाच्या कोणत्याही काना कोपऱ्यातून आल्यावर कोणाला उपाशी ठेवत नाही.हे त्यांच्या लिखाणातून दिसते. ते पुढे म्हणाले की,त्याच साहित्य मराठी पुरत सीमित राहिले नाही.अन्य भाषेत देखील अनुवाद देखील झाले आहे.ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.