26 February 2021

News Flash

७० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यास काँग्रेसचे पुनरुज्जीवन शक्य

खासदार बाळू धानोरकर यांचे परखड मत

खासदार बाळू धानोरकर यांचे परखड मत

चंद्रपूर : काँग्रेसला लोकसभेत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी ७० टक्के उमेदवारी निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या नवीन चेहऱ्यांना आणि ३० टक्के पक्षातील निष्ठावानांना देण्याचे धोरण स्वीकारावे लागेल, अशी भूमिका काँग्रेसचे महाराष्ट्रातील लोकसभेतील एकमेव खासदार सुरेश धानोरकर यांनी मांडली.

खासदार धानोरकर यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसची निवडणूक रणनीती, उमेदवार निश्चित करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे परखड मत व्यक्त केले.

प्रारंभीच त्यांनी आपण काँग्रेसला समजून घेत असल्याचे मिश्किलपणे स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये संघटनात्मक जबाबदारी घ्यावी, असे पक्षात मत होते. परंतु मला माझ्या लोकसभा आणि त्यातील सहा विधानसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित करायचे असल्याने ती जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला.

गावागावात, प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसचा मतदारवर्ग आहे. या जोडीला निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेला म्हणजे स्वबळावर किमान ४० हजार मते घेऊ शकणारा उमेदवार दिल्यास काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत विजय  निश्चित आहे.

काँग्रेसला उमेदवारी देण्याच्या पारंपरिक धोरणात बदल करावा लागेल. भाजपला हरवायचे असेल तर त्यांच्याच व्यूहरचनेत त्यांना अडकवण्याची रणनीती आखावी लागेल.  निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी आणि  आपल्या पारंपरिक मतांचे विभाजन रोखावे लागेल.

भाजपला कोणत्याही पक्षातून आलेला उमेदवार चालतो. ते केवळ जिंकून येण्याची क्षमता बघतात. काँग्रेसमध्ये असे क्वचित घडते. येथे बाहेरून येणाऱ्यांपेक्षा वर्षांनुवर्षे पक्षात असलेल्यांना संधी दिली जाते. त्यामुळे सात-सात, आठ-आठ वेळा एकच उमेदवार दिसतो. नवीन चेहऱ्याला संधी मिळत नाही. निवडून येण्याची शाश्वती नसली तरी त्याच नेत्याला उमेदवारी. आता लाट येण्याचे दिवस संपले आहेत. निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेले नवीन चेहरे ७० टक्के आणि निष्ठावानांमधून ३० टक्के उमेदवार हे धोरण स्वीकारावे लागेल. केवळ पक्ष, संघटना असे म्हणून चालणार नाही. लोकांची कामे करायची असतील तर सत्ता हवी. सत्ता असेल तर पक्षही बळकट होईल, असेही ते म्हणाले.

राजकीय प्रगतीसाठी शिवसेना सोडली

आमचे घराणे काँग्रेसी आहे. मी शिवसेनेत २७ वर्षे काम केले. पण, भाजपसोबत युती असल्याने मला राजकारणात फार पुढे जाता आले नाही. शिवसेना वाढणार नाही, यासाठी भाजप प्रयत्न करीत असते. ज्यावेळी भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले, तेव्हा मी आमदार झालो.

युतीचा फायदा शिवसेनला कधीच झाला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझे तेव्हा आणि आताही अतिशय चांगले संबंध आहेत. मी नाराजीमुळे शिवसेना सोडली नाही तर आपल्या राजकीय प्रगतीसाठी सोडली. भाजपपेक्षा शिवसेना जुना पक्ष असूनही शिवसेना सर्व ४८ जागांवर उमेदवार देऊ शकत नाही. याचे कारण भाजपसोबतची अनेक वर्षांची युती हे आहे. आता वेगळे झाल्याने त्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळू शकेल, असेही म्हणाले.

घराणेशाहीला विरोध नाही पण..

मतदारसंघात चांगले काम असेल तर पक्षाने नेत्यांचा मुलगा, बायको, भाऊ किंवा अन्य कोणीही नातेवाईकाला उमेदवारी देण्यास काहीच वावगे नाही. परंतु निवडून येण्याची क्षमता नसताना उमदेवारी देऊन पक्षाची ती जागा गमावण्यात काहीच अर्थ नाही, असे माझे मत आहे.

भाजपचे अनेक खासदार नगरसेवक लायकीचे नाहीत

भाजप केंद्रीय पद्धतीने निवडणुका लढतो म्हणून एवढय़ा जागा दिसतात. त्यांचे अनेक खासदार असे आहेत की जे नगरसेवक म्हणूनही निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळेच भाजपने अद्याप पंतप्रधान पदाचा दुसरा उमेदवार जाहीर केला नाही. राममंदिर भूमिपूजन कार्यक्रम केवळ मोदींवर केंद्रित राहील याची काळजी घेण्यात आली. या काळात अमित शहा यांनी साधे ट्विट किंवा विधान केले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 4:43 am

Web Title: if 70 percent new faces given a chance revival of congress is possible mp suresh dhanorkar zws 70
Next Stories
1 तोडग्याची जबाबदारी डॉ. विकास, डॉ. प्रकाश आमटेंवर
2 गणेशभक्तांसाठी कोकणची वाट खडतरच
3 पीक कर्जवाटपात सहकारी बँकांची आघाडी
Just Now!
X