रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात करोनाचे ९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या १५५ वर पोहोचली आहे. अलिबाग तालुक्यातही करोनाचा शिरकाव झाला आहे, सोमवारी पनवेल मनपा हद्दीत ५, पनवेल ग्रामिण हद्दीत ३ तर अलिबाग येथे करोनाचा एक रुग्ण आढळून आला आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील ११५० जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ९६६ जणांचे अहवाल नकारात्मक आले. १५५ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर २९ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ५६ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ९५ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ६६, पनवेल ग्रामीण हद्दीतील २२, उरण मधील ३, श्रीवर्धन मधील १, कर्जत मधील १ तर अलिबाग मधील २ रुग्णाचा समावेश आहे. पनवेल मनपा हद्दीतील ४ जण आज करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

अलिबाग तालुक्यात करोनाने शिरकाव केला आहे. अलिबाग तालुक्यात चोवीस तासात दोन रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारी तळवडे येथे आला होता. त्याला करोनाची लागण झाल्याचे काल समोर आले होते. तर रामराज मोरांडे येथील २४ वर्षीय तरुणालाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर पनवेल येथील कोव्हीड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी सुरु करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In raigad the number of corona patients increased by 9 in a day the number total number in the district is over 155 aau
First published on: 05-05-2020 at 20:38 IST