बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणा-या आणि देशात विशिष्ट पूजाविधीसाठी एकमेव ठिकाण असलेल्या त्र्यंबकेश्वरमधील दोन पुरोहितांकडे कोट्यावधींचे घबाड सापडले आहे. या दोन पुरोहितांकडून तब्बल २ कोटी रुपयांची रोकड आणि साडे चार किलो सोने जप्त केल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.

आयकर विभाग, सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाने भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. नोटाबंदीनंतर देशभरात कारवाईचा धडाका लावणा-या आयकर विभागाचा त्र्यंबकेश्वरमधील पुरोहितांवर ‘कोप’ झाला आहे. मंगळवारी आयकर विभागाने नऊ पुरोहितांना नोटीस बजावली होती. गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाकडून दोन पुरोहितांची कसून चौकशी केली जात होती. या दोन पुरोहितांची तीस तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान आयकर विभागाला दोन कोटींची रोकड आणि साडे चार किलोंचे सोने सापडले आहे. ज्या दोन पुरोहितांची चौकशी केली गेली त्यांच्याकडून पुजाविधीसाठी ऑनलाइन नोंदणी केली जात होती. या दोन्ही पुरोहितांच्या कुटुंबियांचे विविध व्यवसाय आहेत. या कुटुंबातील एक – दोन व्यक्ती पौरोहित्य करतात. तर अन्य सदस्य फर्निचर, गॅस, पत्रे आणि सिमेंटचे वितरक, शेती असे व्यवसाय करतात. नोटाबंदीनंतर या पुरोहितांच्या बँक खात्यांमध्ये मोठी रक्कम भरली गेल्याची चर्चा रंगली आहे. पुरोहितांकडून जप्त केलेल्या रोकडमध्ये नवीन नोटा किती आणि जुन्या नोटा किती हे अद्याप समजू शकलेले नाही.

त्र्यंबकमध्ये दररोज शेकडो धार्मिक पूजाविधी होतात. त्यातून पुरोहितांना प्रचंड उत्पन्न मिळते. हे सर्व उत्पन्न कागदोपत्री दाखवले जात नाही. त्यामुळे त्र्यंबकमधील पुरोहित गर्भश्रीमंत झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये नेहमीच असते. नोटाबंदीनंतर देशभरातून आत्तापर्यंत ३०० कोटींपेक्षा रुपयांपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय हजारो कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम जाहीर झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.