भंडारदरा पाणलोट क्षेत्रात बुधवारी मुसळधार पाऊस पडल्याने धरणातून २ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे निळवंडेचा विसर्गही वाढला असून, या पावसाळय़ात प्रथमच प्रवरेच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. आज सकाळी निळवंडेतून ३ हजार ५३२ क्युसेक विसर्ग सुरू होता.
निळवंडे धरण बुधवारीच ओव्हरफ्लो झाले. रात्री भंडारदरा पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडला. रतनवाडी ६७ मिमी, घाटघर ५४ मिमी, पांजरे ३३ मिमी, भंडारदरा ३१ मिमी. या पावसामुळे धरणात येणारी पाण्याची आवक वाढली, त्यामुळे आज धरणातून पुन्हा जास्त प्रमाणात पाणी सोडावे लागले. सकाळी भंडारदरा धरणातून २ हजार ३० क्युसेक विसर्ग सुरू होता. भंडारदऱ्यातून सोडण्यात येणारे पाणी तसेच कृष्णवंतीसह ओढय़ानाल्यांचे पाणी यामुळे निळवंडेत २४ तासांत ३०१ दलघफू नवीन पाणी आले. निळवंडेचा पाणीसाठा आज सकाळी ६ हजार ७०६ दशलक्ष घनफूट झाला होता. निळवंडेची साठवण क्षमता ६ हजार ५३७ दशलक्ष घनफूट आहे. धरणातील पाणीपातळी वाढल्याने ओव्हरफ्लोमध्ये वाढ झाली. आज सकाळी निळवंडे धरणातून ३ हजार ५३२ क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात पडत होते. त्यामुळे या पावसाळय़ात प्रथमच प्रवरेच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे.