राष्ट्रवादीतील वाद

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी स्थानिक नेतृत्वाच्या विरोधात आपली तलवार तूर्त म्यान केली असल्याचे चित्र असले तरी त्यांचा हा पवित्रा पक्षाच्या दृष्टीने, असून अडचण, नसून खोळंबा, असा झाला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार भास्कर जाधव आणि कदम यांच्यात कमालीचे राजकीय वैमनस्य असून जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तालुकानिहाय कार्यकर्ता शिबिरांना ते जाणीवपूर्वक गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांच्या भावी राजकीय वाटचालीबाबत विविध तर्क लढवले जात होते. पण गेल्या रविवारी झालेल्या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीला कदमांनी हजेरी लावून तूर्त तरी आपला पक्षातच राहण्याचा इरादा असल्याचे स्पष्ट केले. मात्र यावेळी बोलताना त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरच निर्णय करण्यात यावेत, अशी मागणी करत चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत मागील खेपेप्रमाणेच आपल्याला सर्वाधिकार असावेत, असे अप्रत्यक्षपणे सुचवले. पक्षाचे प्रभारी आमदार जाधव यांना हे मान्य नसल्यामुळे भावी काळात या मुद्यावरून या दोन नेत्यांमध्ये वाद पेटण्याची दाट चिन्हे आहेत. त्यावेळी पक्षाचे राज्य पातळीवरील नेतृत्व काय भूमिका घेते, याबाबत आत्ताच अंदाज बांधणे अवघड असले तरी कदमांचा पक्षात राहून आपल्या तथाकथित हक्कांसाठी भांडण्याचा पवित्रा स्थानिक नेत्यांसाठी, असून अडचण, नसून खोळंबा, या उक्तीसारखा झाला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य नेतृत्वाने जिल्हा प्रभारींना सर्वाधिकार दिले असल्याचे जाधव यांनी वेळोवेळी नमूद केले आहे. पण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी कदम यांचे अतिशय सख्य आहे, तर जाधवांचे पूर्वापार राजकीय वितुष्ट आहे, हे लक्षात घेता, चिपळूणपुरता या भूमिकेत अपवाद केला जाणार नाही ना, अशी शंकेची पाल जाधव समर्थकांच्या मनात चुकचुकत आहे. त्याचबरोबर, तसे अधिकार मिळाले नाहीत तर त्यावेळी स्वतंत्र आघाडीसह सर्व पर्याय कदम यांनी खुले ठेवले असल्याचे सांगितले जाते.

या बैठकीच्या व्यासपीठावर जाधव आणि कदम एकमेकांशेजारी बसूनही एकमेकांशी चकार शब्दही बोलले नाहीत, हेही त्या दृष्टीने नोंद घेण्यासारखे आहे. मात्र कदम यांच्या आत्तापर्यंतच्या वर्तनावर अप्रत्यक्ष भाष्य करताना जाधव यांनी, पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, असे सुनावत, जे येतील त्यांना बरोबर घ्या आणि न येणाऱ्यांना बाजूला ठेवा, हा कार्यकर्त्यांना दिलेला कानमंत्र त्यांच्या मनातील भावना व्यक्त करणारा आहे.