राष्ट्रवादीचे स्टार नेते मानले जाणारे धनंजय मुंडे यांची राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदी वर्णी लागण्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या मनात वेगळेच काही आहे. कारण, त्यांना मंत्रिपदाऐवजी पक्षवाढीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची सध्या चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक आणि अभ्यासू नेता अशी धनंजय मुंडे यांची ओळख आहे. त्यांच्या याच स्वभाव वैशिष्ट्याचा फायदा पक्षाला विधानसभा निवडणुकीतही झाला आहे. त्याचबरोबर प्रतिष्ठेची निवडणूक असलेल्या परळी मतदारसंघातून त्यांनी तत्कालीन मंत्री आणि गोपिनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यामुळे राज्यात त्यांना मंत्रिपद निश्चित असल्याचे बोलले जात आहे. मंत्री होण्याची धनंजय मुंडे यांची स्वतःची इच्छा असल्याचीही चर्चा आहे. मात्र, आता त्यांच्यातील नेतृत्वगुणांना आणखी वाव देण्यासाठी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता असल्याचे सुत्रांकडून कळते.

आणखी वाचा – मंत्रिमंडळात संधी दिली तर त्याचं सोनं करेन – रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची निवड केली जाऊ शकते. त्यामुळे ही दुसरी व्यक्ती म्हणून धनंजय मुंडे यांच्या नावाला पक्षातील अनेक नेत्यांची पसंती आहे. त्याचबरोबर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली असल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागू शकते.

दरम्यान, मंत्री झाल्यानंतर भगवानगडावर येण्याचे निमंत्रण गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना दिले होते. मात्र, एकूणच चर्चांचा विचार करता आता मंत्रीपदाऐवजी प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होऊनच धनंजय मुंडे भगवान गडावर जाण्याची शक्यता आहे.