देशात करोना रुग्णसंख्या वाढत असून यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक करोना रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात आहेत. यामध्ये जळगावचाही समावेश आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक शहरांनी लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगावातील स्थितीसंबंधी माहिती दिली असून लॉकडाउनसंबंधीही भाष्य केलं आहे. ते जिल्हा अधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.

“मोठ्या प्रमाणात करोनाचं संकट वाढू लागलं आहे. मुख्यमंत्र्यांसहित सर्वजण आवाहन करत आहेत. काही तालुक्यातमध्ये प्रमाण वाढलं आहे. लॉकडाउनसंबंधी विचार सुरू आहे मात्र वेळ देऊनच निर्णय घेतला जाईल. पण नियमांचं पालन केलं पाहिजे यावर एकमत आहे,” असं अभिजित राऊत यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात
“सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे,” अशी माहिती बुधवारी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.