जळगावमधील समीकरणे बदलली

राज्यातील सत्तेत भाजप-शिवसेना युती असताना आणि विरोधकांमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बहुतांश ठिकाणी आघाडीचे राजकारण करीत असताना जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वच काही उलट झाल्याचे दिसून आले. जिल्हा पातळीवर चारही पक्षांच्या राजकीय संसारात कितीही भांडणे झाली तरी घटस्फोटापर्यंत वाद पोहचला नव्हता. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच भाजपने शिवसेनेसोबत तर राष्ट्रवादीने काँग्रेससोबत काडीमोड घेतला. काँग्रेसच्या मदतीने भाजपने अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांवर वर्चस्व मिळविले असले तरी त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळे जिल्’ाात नवीन राजकीय समीकरण तयार झाले असून शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत संसार थाटला आहे. चारही पक्षांचा नवा संसार केवळ जिल्हा परिषदेपुरता मर्यादित न राहता महानगरपालिका निवडणुकीतही हीच परिस्थिती राहण्याचे संकेत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी दिले आहेत.

तीन पंचवार्षिकपासून भाजप व शिवसेना जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वंतत्रपणे लढत असले तरी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून दोन्ही पक्ष सत्तेसाठी कायम एकत्र येत गेले. यंदाही तसेच घडेल, अशी अटकळ होती. भाजप, सेनेने यावेळीही जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक स्वतंत्रपणे लढविली होती. दुसरीकडे त्यांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादी व कॉंग्रेसने एकत्रित येत भाजप, शिवसेनेला धक्का देण्याचा प्रयत्न केला. एकमेकांच्या विरोधात उमेदवार न दिल्याने मतांचे विभाजन टळल्याने जिल्हा परिषदेत आघाडीची सत्ता येऊ शकेल, असे दोन्ही कॉंग्रेसचे स्वप्न होते. प्रचारादरम्यान किरकोळ वाद वगळता दोन्ही कॉंग्रेसने एकत्रितरीत्या मेहनत देखील घेतली. त्यातच भाजपमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील बेबनाव आघाडीच्या पथ्यावर पडू शकतो, अशीही हवा तयार झाली होती. यामुळे मतमोजणीच्या दिवसापर्यंत कोणत्या पक्षाला किती यश मिळेल हे सांगणे अवघड झाले होते.

निकालात मात्र भाजपला अनपेक्षितरीत्या अधिक जागा मिळाल्या. मतमोजणीपूर्वी भाजपला २७ ते २८ जागा मिळतील अशी अपेक्षा खुद्द भाजपच्या नेत्यांना असताना भाजपने ३३ जागांवर विजय मिळवीत सर्वानाच चकित केले. सत्ता स्थापनेसाठी त्यांना केवळ एका मताची आवश्यकता उरली. शिवसेनेनेही समोरील परिस्थिती ओळखून भाजपकडे मैत्रीचा हात पुढे केला. परंतु, काहीही झाले तरी शिवसेनेला सत्तेत वाटेकरी होऊ द्यायचे नाही असा विडाच खडसे व महाजन यांनी उचलला होता. याच काळात काँग्रेसचा एक सदस्य भाजपच्या गळाला लागला. यामुळे भाजप जादुई ३४ चा आकडा गाठेल असे स्पष्ट झाले. त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील २० ते २५ वर्षांच्या संसाराला तडा गेला. शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतीश पाटील यांच्याशी हातमिळवणी केली. त्यास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनीही पाठिंबा दिला. यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस असे नवे समीकरण उदयास आले. हे समीकरण त्रासदायक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने वेगळेच डावपेच आखले. त्याची प्रचीती थेट जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सर्व सदस्य सभागृहात जमल्यावर शिवसेना, राष्ट्रवादीला आली.

शिवसेना व राष्ट्रवादी भाजपविरोधात एकत्रित राहिले, परंतु भाजपला काँग्रेसने साथ दिली. कॉंग्रेसच्या चारही सदस्यांनी भाजपला उघडपणे मतदान केले. कॉंग्रेसने ऐनवेळी केलेल्या दगाफटक्यामुळे राष्ट्रवादीलाही धक्का बसला. भाजपला मदत करणाऱ्या काँग्रेसला सत्तेचे वाटेकरी करण्याची ग्वाही खडसे यांनी दिली आहे. महाजन यांनीही हे समीकरण आगामी जळगाव महापालिका निवडणुकीत देखील कायम राहील, असे नमूद केले. यामुळे महापालिका निवडणूक शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निकालात मात्र भाजपला अनपेक्षितरीत्या अधिक जागा मिळाल्या. मतमोजणीपूर्वी भाजपला २७ ते २८ जागा मिळतील अशी अपेक्षा खुद्द भाजपच्या नेत्यांना होती. निकालात भाजपला अनपेक्षितरीत्या अधिक जागा मिळाल्या. मतमोजणीपूर्वी भाजपला २७ ते २८ जागा मिळतील अशी अपेक्षा खुद्द भाजपच्या नेत्यांना होती.