बारा दिवसांपासून जामखेड येथील काझी गल्लीतील धार्मिक स्थळांमध्ये आढळून आलेल्या १० परदेशी व ४  इतर राज्यांतील अशा चौदा नागरिकांपैकी दोन जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह निघाल्याने या चौदा लोकांच्या संपर्कात आलेल्या ३१ लोकांना ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी नगरला पाठविले आहे. त्याचबरोबर शहरासह तालुक्यातील मुस्लीम समाजाची प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आहेत.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. १४ मार्च रोजी नगर येथील मुकुंदनगर भागातून आशिया खंडातील आयव्हरी कोस्ट, इराण, टांझानिया या देशातील १० जण तर मुंबई व तामिळनाडू येथील ४ जण असे एकूण १४ नागरिक जामखेड येथील काझी गल्लीतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी दि. २६ मार्चपर्यंत म्हणजे बारा दिवस वास्तव्यास होते. याबाबत संबंधित ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी याची कल्पना प्रशासनाला न दिल्यामुळे तसेच जमावबंदी असतानाही धार्मिक स्थळांमध्ये १४ नागरिक वास्तव्यास ठेवल्यामुळे स्ट्रस्टच्या तीन जणांविरोधात कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या चौदा जणांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये रविवार, दि. २९ रोजी १८ जणांना तर सोमवार, दि. ३० रोजी १३ जणांना अशा एकूण ३१ जणांना तपासणीसाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये  जामखेड येथील पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. यानंतर महसूल प्रशासनाचे तातडीने पावले उचलत सोमवार, दि. ३० रोजी मुस्लीम समाजाची तालुक्यातील राजुरी, लोणी, सांगवी (मुसलमानवाडी), लोणी, बावी, हळगाव, दिघोळ, पाटोदा, धनेगांव, फक्राबाद व पिंपळगाव आळवा सह शहरातील काझी गल्ली व खर्डा चौकातील दोन ठिकाणची प्रार्थना स्थळे सील करण्यात आली आहेत, अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली.