विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यांना ठाकरे सरकारनं उत्तर दिली. मुंबईसह राज्यातील इतर शहरातून मजुरांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या मुद्यावरून फडणवीस यांनी राज्यातील भूमीपुत्रांकडे ती कौशल्य नसल्याचं वक्तव्य केलं होतं. फडणवीस यांच्या वक्तव्याला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीची वास्तविक माहिती दिली. मंगळवारी फडणवीस यांनी “भूमिपुत्रांना स्थलांतरित मजुरांची काम करणं शक्य होणार नाही. भूमिपुत्रांना संधी मिळाली, तर आनंदच आहे, पण राज्य सरकार त्यांच्यामध्ये असं कौशल्य दोन महिन्यांत विकसित करू शकणार नाही,” असं म्हटलं होतं.

आणखी वाचा- भाजपा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू?- जयंत पाटील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस यांनी केलेल्या विधानावरून जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला. “देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, सर्व मजूर राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. त्या लोकांकडे असलेलं स्किल महाराष्ट्रातील लोकांकडं नाही. फडणवीसांनी महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखण्याचं काम केलं. राज्याच्या तरुणांमध्ये, जनतेमध्ये स्किल आहे. ते पूर्ण ताकदीनं ही कारखानदारी चालू करू शकतात, असा विश्वास आहे. जे गेले आहेत, ते परत येतील. पण, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कारखानदारी सुरू व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील युवकांकडे स्कील आहे. स्किल इंडिया नावाचा कार्यक्रम नरेंद्र मोदी यांनी सुरू केला. तो फेल गेला की काय, असा प्रश्न निर्माण करणार विधान फडणवीस यांचं आहे. मागच्या पाच वर्षात स्किल इंडियानं काही स्किल दिली असतील, त्याचाही वापर झाला पाहिजे. पण, त्यावर फडणवीस यांचा विश्वास दिसत नाही,” असं म्हणत पाटील यांनी विधानाचा समाचार घेतला.