राज्यातील सर्व बंद मंदिरे उघडा अन्यथा कार्यकर्ते कायद्याचा भंग करून मंदिरे उघडतील. असा इशारा सरकारला देत भाजपा कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या पायथ्याशी जागरण गोंधळ करून आंदोलन केले. राज्यातील सर्व मंदिरे शासनाने करोनाचा प्रादुर्भाव वाढेल म्हणून बंद ठेवली आहेत. मंदिर बंद ठेवल्यामुळे तीर्थ क्षेत्रातील अर्थव्यवस्था कोलमडली असून लोकांची उपासमार सुरू आहे .यामुळे भाजपा आक्रमक झाले असून आज राज्यात सर्व ठिकाणी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले .

जेजुरीमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडोबा पायथ्याशी सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा नेते जालिंदर कामठे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, सागर भुमकर, धनंजय कामठे, भाजपा तालुका उपाध्यक्ष निलेश जगताप, मैनाताई जाधव, सचिन पेशवे, साकेत जगताप, प्रसाद अत्रे , गणेश भोसले, सुनिता कसबे, अलका शिंदे, ऍड सरला तिवारी, श्रीकांत ताम्हाणे श्रीकांत थिटे आदी उपस्थित होते.

राज्य शासनाने केवळ स्वतःचा स्वार्थ पाहिला असून सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा खेळखंडोबा मांडला आहे असा आरोप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केला तर राहुल शेवाळे यांनी शासनाने मद्यालये उघडली पण मंदिरे मात्र बंद ठेवली याचा निषेध केला. देशातील मथुरा काशी अक्षरधाम तिरुपती यासारखे मंदिरे उघडली मग महाराष्ट्रातच बंद का असा सवाल निलेश जगताप यांनी केला . यावेळी खंडोबाचे जागरण गोंधळ करून पोट भरणारे वाघ्या मुरळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांनी सरकारला जाग येण्यासाठी संबळ ,खंजिरी, तुणतुणे अशी पारंपारिक वाद्य वाजवीत जागरण गोंधळ केले .आम्ही उपाशी आहोत अशी आर्त हाक सरकारला घातली .भाजपचे हे मंदिरे उघडण्यासाठी दुसरे आंदोलन आहे ,यापूर्वी मनसेनेही खंडोबाच्या पायथ्याशी आंदोलन केले होते ,गेले सहा महिने खंडोबा मंदिर बंद असल्याने येथे भाविक येणे बंद झाले आहे त्यामुळे भाविकांवर उपजीविका असणारी कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत लॉज धर्मशाळा हॉटेल ढाबे ओस पडल्याचे चित्र दिसत आहे

भाजपा नेत्यांनी केला तळी भंडारा</strong>
सरकारला जाग येण्यासाठी भाजप नेत्यांनी एकत्र येत आज खंडोबाचा तळी भंडारा केला यावेळी खंडेराया सरकारला लवकर मंदिर उघडण्याची बुद्धी दे.अशी प्रार्थना करून भंडारा उधळण्यात आला.