राज्यात करोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असेल आणि शनिवारी-रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे. तर, ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषद घेऊन राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला संपूर्ण सहकार्य केले जाणार असल्याचे जाहीर केले. करोनाची भयावह परिस्थिती पाहून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनीही सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं. त्यांच्या या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केलं आहे.

काय म्हणाले होते फडणवीस ?
फडणवीस यांनी, सरकारने करोनाच्या नव्या प्रकाराबाबत चर्चा करायला हवी व राज्यात प्रादुर्भाव का वाढत आहे, याबाबत विवेचन करायला हवं, असा सल्ला दिला. “राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचं लक्षात येत आहे. यामध्ये आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाउन आणि अन्य दिवशी कडक निर्बंध अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं लक्षात येत आहे. आम्ही जनतेला आवाहन करतो, की या संपूर्ण निर्णयाला जनतेने सहकार्य करावं. भाजपाच्या कार्यकर्त्यांना देखील आम्ही आवाहन केलं आहे, की आताची करोनाची भयावह परिस्थिती पाहता कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी देखील सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी. जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करता येईल, त्या दृष्टीने लसीकरण मोहीमेत भाजपाचे कार्यकर्ते सक्रीयतेने सहभागी होतील. हा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे.” असं फडणवीस म्हणाले होते.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया :-
त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना फडणवीसांच्या भूमिकेचं कौतुक केलं. शिवाय करोनाचं संकट वाढतंय… एकमेकास सहाय्य करु असंही आव्हाड म्हणाले. “प्रशंसनीय भूमिका …करोनाचं संकट वाढत आहे… एकमेकास सहाय्य करू या…”, असं ट्विट करत आव्हाड यांनी फडणवीस यांनाही टॅग केलं आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून गेल्या 24 तासात देशात एक लाखांहून जास्त नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 478 जणांचा मृत्यू झाला आहे. या आधी गेल्या वर्षी 16 सप्टेंबर 2020 ला देशातील सर्वात जास्त म्हणजे 97,894 रुग्णांची भर पडली होती. तर, राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 57 हजार 074 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात मागील 24 तासांत कोरोनामुळे 222 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 27508 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.