हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी यवतमाळमधील न्यायाधीश पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसिम अक्रम आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात हा गुन्हा दाखल झाला असून १५ लाख रुपयांचा हुंडा मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार नांदेडमधील रहिवासी शेख वसिम शेख अक्रम जलाल (वय २८) हे न्यायाधीश असून यवतमाळ जिल्ह्यात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून ते कार्यरत आहे.त्यांचा डिसेंबर २०१६ मध्ये यवतमाळमधील गुलअफशार सुलताना बेगम (वय २५) या तरुणीशी विवाह झाला होता. विवाहात वसिम अक्रम यांच्या कुटुंबीयांनी १५ लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे.

लग्नानंतरही वसिम अक्रम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळ केला. लग्नापूर्वी वसिम अक्रम यांनी कारसाठी साडे तीन लाख रुपये घेतले होते. लग्नानंतरही त्यांनी हुंड्यासाठी छळ सुरुच ठेवल्याने पोलिसांकडे तक्रार केल्याचे, विवाहितेने म्हटले आहे. वसिम अक्रम आणि कुटुंबीयांनी घरात डांबून ठेवल्याच आरोपही महिलेने केला आहे. वसिम अक्रम यांच्यासह सात जणांविरोधात पोलिसांनी हुंड्यासाठी छळ करणे, मारहाण करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अक्रम यांचे बंधू आणि एक नातेवाईकही न्यायाधीश असून त्या दोघांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अक्रम कुटुंबिय सध्या पसार झाले आहे.

दरम्यान, लग्नाच्या काही दिवसांनी पती- पत्नीमध्ये टोकाचे वाद झाले. यानंतर एका पोलिसांनी सामोपचाराने यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील केला होता. पण दोघांमधील भांडण मिटले नव्हते. गुलअफशार सुलताना बेगम यांचे वडीलही निवृत्त न्यायाधीश आहेत.