27 November 2020

News Flash

‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीला मारहाण; आमदार जयंत पाटील यांचा पत्रकार संघांकडून तीव्र निषेध

"राज्यपाल सी.विद्यासागरराव यांनी गांभीर्य पुर्वक दखल घेऊन त्याचे विधानसभेतील सदस्यत्व रद्द करावे"

संग्रहित छायाचित्र

अलिबाग येथील ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांना कोणतेही कारण नसताना मारहाण करणारे शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा राज्यातील विविध पत्रकार संघटनांकडून निषेध होत आहे. महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघटना, कोल्हापूर, सांगली, ठाणे, भिवंडी अशा विविध भागांमधील पत्रकार संघटनांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

गुरुवारी रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा विजय निश्चित झाल्यानंतर मतमोजणी केंद्रावर अनधिकृतरीत्या आलेले आमदार जयंत पाटील यांनी लोकसत्ताचे प्रतिनीधी हर्षद कशाळकर यांना मारहाण केली होती. या प्रकरणी आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्यांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई प्रेस क्लबकडून निषेध
मुंबई प्रेस क्लबने या मारहाणीचा निषेध केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला, पण गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी उशीर केला. याप्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई करावी करावी, अशी मागणी प्रेस क्लबच्या सचिव लता मिश्रा यांनी केली आहे.

ठाण्यातील पत्रकार संघाकडूनही निषेध
प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून कायम जनमानसाचे योग्य चित्रण मांडण्याचा प्रयत्न होत असतो. हा प्रयत्न काही जणांना फारच झोंबल्यानंतर शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यासारखी आततायीपणाची कृती होत असते. केवळ निवडणूकीच्या दरम्यान विरोधात वृत्त प्रसिद्ध केल्याने त्यांनी अलिबाग येथील लोकसत्ताचे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केली आहे. हा मारहाणीचा ठाणे दैनिक पत्रकार संघ निषेध करीत आहे. हर्षद कशाळकर यांना शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून गुरुवार दि 23 मे रोजी मारहाण केली. एवढेच नव्हे तर आम्ही आमदार असल्याने आमचे कोणी काही करु शकत नसल्याचा दम दिला. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचे हे वागणे निश्चित निंदनीय आहे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघा चा वातिने या मुज़ोर नेते मंडळीचा ज़ाहिर निषेध करत आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारां सोबत ठाणे पत्रकार संघ निषेध करत असताना अशा लोकप्रतिनिधीवर कारवाई होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
– राजेश मोरे, अध्यक्ष, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून निषेध
`लोकसत्ता’चे रायगड प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. `एखाद्या वृत्तपत्र प्रतिनिधीवर अशाप्रकारे हल्ला होणे, ही लाजिरवाणी बाब आहे. सरकारने या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन श्री. जयंत पाटील आणि त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी देखील वाबळे यांनी या पत्रकात केली आहे. कशाळकर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकार सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा नेणार आहेत. या मोर्चाला मुंबई मराठी पत्रकार संघाने संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. याप्रकरणी दै. लोकसत्ता आणि हर्षद कशाळकर यांच्यामागे पत्रकार संघ खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही देखील पत्रकात देण्यात आली आहे.

लोकशाहीला काळीमा फासणारी घटना

अलिबाग येथे बेकायदा मतमोजणी केंद्रात घुसून लोकसत्ताचे पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी मारहाण तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली,हि घटना अत्यंत दुर्दैवी व लोकशाहीला काळीमा फासणारी आहे,आ.जयंत पाटील यांचा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. लोकशाहीचा चौथास्तंभ असलेल्या पत्रकारावर लोकशाहीतीलच एक घटक असलेल्या लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे हल्ला करणे हे लोकशाहीलाच घातक आहे.पत्रकारिता करतांना अभिव्यक्ति स्वातंत्र्य असलेल्या पत्रकारास आपल्या वर्तमानपत्रातून वस्तूस्थिती मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे व तोच अधिकार कशाळकर यांनी वापरला आहे.मात्र निवडणूकीत आपल्या पक्षाची सुमार कामगिरी सहन न झाल्याने आ.पाटील यांनी चक्क पत्रकारावर हात उचलला आहे. जयंत पाटील यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करतानाच त्यांना अटक करुन त्यांचेवर अजामिनपात्र गुन्हा दाखल करावा.या घटनेची राज्य सरकार व राज्यपाल सी.विद्यासागरराव यांनी गांभीर्य पुर्वक दखल घेऊन त्याचे विधानसभेतील सदस्यत्व रद्द करावे,अशी मागणी करत आहोत.

यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ,नाशिक

राज्यपालांनी गंभीर दखल घ्यावी : निवडणूक अधिकारी यांनी फिर्याद द्यावी

हर्षद कशाळकर यांना झालेल्या मारहाणीचा सांगली जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने निषेध केला. सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार एक होऊन हर्षद कशाळकर यांच्या सोबत आहेत. रायगड जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन जयंत पाटील आणि त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांना तातडीने अटक केली पाहिजे होती. आतातरी त्यांनी आपल्या चुकीची दुरुस्ती करून आमदार पाटील यांना व त्यांच्या गुंडांना अटक करावी. ही मारहाण निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात झाली असल्याने जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी या प्रकरणी फिर्यादी व्हावे तसेच तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या दंडाधिकारांसमोर साक्षी नोंदवून आपली जबाबदारी पार पाडावी. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी पत्रकारांचा मोर्चा मराठी पत्रकार परिषदेने आयोजित केला आहे त्यासही सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ जाहीर पाठींबा देत आहे, तातडीने आमदार पाटील यांना अटक करण्यात यावी त्यासाठी राज्यपाल यांनीही आ पाटील यांच्या कृत्याची गंभीर दखल घ्यावी असे आवाहन आम्ही राज्यपाल सी विद्यासागर राव यांना करीत आहोत.
– शिवराज काटकर राज्य उपाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद
– जालिंदर हुलवना, जिल्हाध्यक्ष, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि सर्व पदाधिकारी

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 8:23 pm

Web Title: journalist union opposed mla jayant patil attack on journalist harshad kashalkar
Next Stories
1 काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार सुरेश धानोरकर म्हणतात, …तर संपूर्ण भारतात दारुबंदी करा
2 मुरुडमध्ये पॅरा सेलिंग बेतले जिवावर; १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
3 भाजपा कार्यकर्त्याची हत्या, काँग्रेस उमेदवारासह १० जणांविरोधात गुन्हा
Just Now!
X