विषयाच्या र्सवकष मांडणीसह उदाहरणांची सुरेख पेरणी करणारी काजल बोरस्ते ही ‘लोकसत्ता’ आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत नाशिक विभागातून दाखल झाली आहे काजल ही नाशिक येथील हं प्रा ठा या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून एकापेक्षा एक सरस असलेल्या एकूण ११ प्रतिस्पध्र्यावर मात करून तिने हे यश मिळविले आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ, नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व जनकल्याण सहकारी बँकेच्या सहकार्याने आयोजित स्पर्धेच्या नाशिक विभागाची अंतिम फेरी बुधवारी येथील कुसुमाग्रज स्मारकात रंगली.
या फेरीत प्रथम आलेली काजल बोरस्ते हिला पाच हजार रूपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. व्दितीय क्रमांक मिळविणारी बी वाय के महाविद्यालयाची मुग्धा जोशी हिला तीन हजार रूपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी हं प्रा ठा महाविद्यालयाचा विवेक चित्ते यास दोन हजार रूपये व प्रमाणपत्र देण्यात आले. उत्तेजनार्थ शासकीय अभियांत्रिकीचा प्रविण खरे आणि के टी एच एम महाविद्यालयाची श्वेता भामरे यांना गौरविण्यात आले.
प्राथमिक फेरीत ६२ स्पर्धकांमधून पात्र ठरलेल्या १२ स्पर्धकांनी अंतिम फेरीत आपला कस दाखविला. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील विद्यार्थ्यांनी वक्तृत्वातून घडविलेल्या चौफेर ज्ञानाच्या दर्शनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. या फेरीसाठी भारतीय पुराणातील वानगी, ओबामा आले, पुढे काय ?, संवाद माध्यमे आणि आम्ही, आम्हाला जाहिराती आवडतात कारण.. आणि मराठी अभिजात झाली, मग..हे विषय होते. बहुतेक स्पर्धकांनी मराठी अभिजात झाली, मग.. आणि आम्हाला जाहिरात आवडतात कारण..या विषयावर बोलणे पसंत केले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पुण्याच्या प्रसिद्ध लेखिका निलीमा बोरवणकर, नाशिकच्या वैशाली शेंडे आणि उपरेंद्र वैद्य यांनी काम पाहिले.