कार्तिकी वारी निमित्त पंढरीत भाविक दाखल होऊ लागले आहेत. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून भाविक या वारीसाठी पंढरीत येतात. शनिवारी सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत भाविकाची गर्दी झाली आहे. तर विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शनासाठी ६ ते ७ तासांचा कालवधी लागत आहे. एकादशी १९ नोव्हेंबर रोजी आहे.

यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळाचे सावट कार्तिकी यात्रेवर दिसून येईल, असा अंदाज प्रशासनाचा आहे. मात्र नवमी म्हणजे शनिवारी राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून जवळपास तीन लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. या वारीसाठी मुंबई, कोकण येथून भाविक मोठ्या संख्येने येतात. याच बरोबरीने मराठवाडा आणि कोल्हापूर, सांगली येथून भाविक न चुकता कार्तिकी वारीला पंढरीला येत असतो. यंदाच्या वारीला शनिवारी पदस्पर्श दर्शनरांग पत्राशेड येथे पोहोचली आहे. त्यामुळे भाविकांना सुमारे ६ ते ७ तास दर्शनासाठी वेळ लागत आहे.

वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरीतील मठ, धर्मशाळा, लॉज भाविकांनी तुडूंब भरू लागली आहेत. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत भाविकांची राहण्याची सोय पालिका प्रशासनाने केली आहे. या ठिकाणी सुमारे १ लाख ८३ हजार भाविकांची नोंद झाली आहे. या ठिकाणी २४ तास पिण्याचे पाणी, वीज, वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. याचबरोबर चंद्रभागा वाळवंट येथे देखील भाविकांनी राहुट्या टाकल्या आहेत. वाळवंटात पिण्याचे पाणी, वीज आणि तात्पुरते शौचालये उभारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या वेळेस तात्पुरत्या शौचालयाच्या स्वच्छतेसाठी जादा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच शहरात पालिकेने स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच पालिकेने वारीसाठी चांगल्या सोयी सुविधा पुरवल्या आहे. मात्र शहरातील अतिक्रमणे काढण्यात पालिकेला याही वारीला अपयश आले आहे. असे असले तरी टाळ, मृदुंग आणि हरीनामचा जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून निघाली आहे.

महसूलमंत्र्याच्या हस्ते कार्तिकी महापूजा

पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापुजा आषाढीला मुख्यमंत्री यांच्या हस्ते तर कार्तिकीला उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे. भाजपा सेनेचे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्यांदा कार्तिकी वारी झाली होती. त्यावेळी शासकीय पूजेचा मान तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मिळाला होता. त्यानंतर कार्तिकी वारीची महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होत आहे. याही वर्षी पाटील यांच्या हस्ते महापुजा होणार आहे.