कुंभमेळ्यातील शाही पर्वणीसाठी पोलिसांनी जाहीर केलेल्या अटी व शर्ती साधू-महंतांनी धुडकावत मनमानी केली. मागील सिंहस्थात चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेस कारणीभूत अनेक कारणांपैकी नाणी व फुलांची प्रसादरूपात उधळण हे एक सांगितले जाते. यामुळे अशा वस्तूंची उधळण करण्यास यावेळी सक्त मनाई होती. मात्र यंत्रणेच्या नाकावर टिच्चून खुद्द महंत ग्यानदास यांनी चक्क दहा रुपयांच्या नोटांची भाविकांवर उधळण केली. प्रतिबंध असताना मिरवणुकीत काहींनी उंट व घोडे सहभागी केले. इतकेच नव्हे तर, घातक शस्त्रांचे खेळ करण्यास बंदी असताना काहींनी थेट रामकुंडापर्यंत साहसी खेळांचे प्रदर्शन करत पोलिसांना एक पाऊल मागे घेण्यास भाग पाडले.
नाशिकच्या वैष्णवपंथीय तीन आखाडय़ांची शाही मिरवणूक आणि स्नानाची वेळ पोलीस यंत्रणेने आधीच निश्चित केली होती. या बाबतचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना अटी व शर्तीचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. लिखित स्वरूपात सर्व माहिती प्रत्येक आखाडय़ाला देत सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी त्या त्या आखाडे व खालशांच्या प्रमुखांवर सोपविण्यात आली. परंतु पोलिसांची नियमावली आखाडे व खालशांनी धाब्यावर बसविली. मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा प्रसाद अथवा नाणी, वस्तू, फुले उधळण्यास प्रतिबंध होता. खुद्द महंत ग्यानदास महाराज यांनी हाती दहा रुपयांच्या नोटांचे बंडल घेऊन श्रीमंतीचे दर्शन घडविले. भाविकांच्या दिशेने त्यांनी नोटांची उधळण केली. काही महंतांनी भाविकांकडे प्रसादरूपात फुले उधळली. घातक शस्त्र बाळगण्यास व शस्त्रांचे खेळ करण्यास प्रतिबंध असताना हा नियमही संबंधितांनी पाळला नाही. प्रत्येक आखाडय़ाकडे पारंपरिक शस्त्रांचे प्रदर्शन करणारे स्वत:चे खास पथक दिमतीला होते. मिरवणूक मार्गावर दांडपट्टा, भाले, तलवारी, चक्र, फरशे फिरविले गेले. त्यातील एका पथकाने रामकुंडावर जाईपर्यंत शस्त्रास्त्रांचे खेळ करीत पोलिसांना बाजूला सारले.
गर्दी व आवाजामुळे हत्ती, उंट व घोडे आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे या प्राण्यांचा मिरवणुकीत वापर केला जाऊ नये, असे साधू-महंतांना आधीच सूचित करण्यात आले. मात्र मिरवणूक दिमाखदार करण्यासाठी निर्मोही आखाडय़ाने सजविलेले उंट सहभागी केले. काही महंतांनी घोडय़ाच्या सजविलेल्या बग्गीतून मार्गक्रमण केले. हत्तीवगळता इतर प्राणी मिरवणुकीत सहभागी झाले. प्राणी ही मनोरंजनाची गोष्ट नसल्याने प्रचंड गर्दी व आवाजामुळे ते बिथरण्याची शक्यता प्राणी संरक्षणासाठी कार्यरत पेटा संस्थेने व्यक्त करीत, मिरवणुकीतील प्राण्यांच्या सहभागास आधीच विरोध दर्शविला होता. परंतु निर्मोही आखाडय़ाने प्राण्यांना सहभागी करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे सांगत त्याचे समर्थन केले.