News Flash

लातूर पॅटर्न आता दुचाकींच्या क्षेत्रात

गेल्या दशकभरात लातूर पॅटर्न सर्वदूर नावाजला. त्याची आता शैक्षणिक बाजारपेठ झाली. या बाजारपेठेत निव्वळ दुचाकी वाहनांची वार्षिक उलाढाल किती असेल? हा आकडा २०० कोटींवर जातो.

| June 22, 2013 05:47 am

लातूर पॅटर्न आता दुचाकींच्या क्षेत्रात

गेल्या दशकभरात लातूर पॅटर्न सर्वदूर नावाजला. त्याची आता शैक्षणिक बाजारपेठ झाली. या बाजारपेठेत निव्वळ दुचाकी वाहनांची वार्षिक उलाढाल किती असेल? हा आकडा २०० कोटींवर जातो. दर्जेदार शिक्षणासाठी पालक लातूरला आपल्या मुलांना वसतिगृहात किंवा भाडय़ाने खोली घेऊन ठेवतात. त्यांना शिकवणी, महाविद्यालयात जाण्यासाठी दुचाकी घेऊन दिली जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत सायकल घेऊन दिली जात असे. त्याची जागा आता दुचाकीने घेतली आहे. शैक्षणिक बाजारपेठ पाहायची असेल तर लातूरच्या अष्टविनायक मंदिराच्या मागच्या बाजूला नुसता फेरफटका मारला तरी एका ओळीत दुचाकींची रांगच रांग दिसते.
दहा वर्षांपूर्वी दहावीपर्यंत शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींनी पाठपुरावा केला, तरच सायकल मिळत असे. दहावीनंतरच स्वयंचलित दुचाकी वाहनांचा विचार केला जात असे. काळ बदलला. आता सायकल सातवीपूर्वीच वापरण्याचे वाहन झाले. रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी असल्यामुळे मुलांना सायकलवर पाठवण्याचे धाडस पालकदेखील करीत नाहीत. घराशेजारच्या गल्लीबोळात सायकल वापरण्याला परवानगी दिली जाते. आठवीनंतर मुलांना वेगवेगळ्या विषयांच्या शिकवण्या लावल्या जातात. तेथे जाऊन येईपर्यंत पाय दुखतात, झोप येते अशी कारणे सांगतात. त्यामुळे पालकांनीही दुचाकी अपरिहार्य असल्याचे मान्य केले आहे.
लातूरमध्ये दरमहा सरासरी २२०० ते २५०० एवढय़ा नवीन दुचाकींची विक्री होते. विना गिअरच्या दुचाकी खरेदी करण्यावर पालकांचा भर असतो. नव्या वाहनांबरोबरच जुन्या वाहनांचीही मोठी बाजारपेठ आहे. जुन्या वाहनांची विक्री करणारे जिल्हय़ात सुमारे १५० व्यावसायिक आहेत. ते दरमहा २५०० ते ३००० वाहनांची विक्री करतात. सायकलीच्या किमतीतही वाढ झाली. त्यांची संख्याही अधिक आहे. मात्र, ४ हजार रुपयांची नवीन सायकल घेण्यापेक्षा ७ ते ८ हजारांमध्ये दुचाकी मिळते. त्यामुळे ही बाजारपेठ तेजीत आहे. दरमहा १० कोटींच्या नव्या दुचाकी, तर ५ कोटींच्या जुन्या दुचाकींची विक्री होते. हा आकडा वर्षांला २१० कोटींच्या आसपास आहे. औरंगाबादनंतर वाहनांची मोठय़ा प्रमाणावर विक्री होणारे गाव म्हणून लातूरची ओळख झाली आहे. शहरात सिटी बसेस नाहीत, मुलींचा रिक्षाने प्रवास सुरक्षित कोठे राहिला आहे? त्यामुळे दुचाकीला पर्याय नाही.
बदलत्या काळानुसार वाहन वापरणे गरजेचे झाले असले, तरी किमान काही शिस्त सर्वानीच लावून घेतली पाहिजे. मात्र, याकडे फारसे कोणाचे लक्ष नाही. मुलांची गरज म्हणून स्वयंचलित वाहने त्यांना वापरण्यास दिली जातात. मात्र, त्याचा योग्य वापर कसा करावयाचा याचे शिक्षण देण्याची आवश्यकता कोणत्याच पातळीवर जाणवत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2013 5:47 am

Web Title: latur pattern in the field of two wheeler
Next Stories
1 निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ‘भांडारकर’च्या घटनादुरुस्तीचा घाट
2 भटक्या कुत्र्यांमधील संसर्गजन्य सीडीव्ही रोगाची वाघांनाही लागण होण्याची भीती व्याघ्र प्रकल्पांना सतर्कतेची सूचना
3 आदिवासींचा छळ थांबवा; अन्यथा राजकीय हत्या घडवू नक्षलवाद्यांची पत्रकाद्वारे धमकी
Just Now!
X