जुन्या बंधाऱ्याचा दगड वापरल्याने मंजूर लांबीपेक्षा १५० मीटर अधिक

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : सातपाटी येथे पतन विभागातर्फे उभारण्यात येणाऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची लांबी मंजूर ८२५ मीटर लांबीपेक्षा सुमारे सव्वाशे ते दीडशे मीटरने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुन्या बंधाऱ्यातील दगड वापरल्याने सातपाटी गावाला अधिक लांबीचा बंधारा मिळणार आहे.

सन २००२ मध्ये तत्कालीन खासदार राम नाईक यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेला सातपाटी किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधारा जीर्ण झाला होता. त्याचप्रमाणे या बंधाऱ्यात अनेक ठिकाणी भगदाड पडल्याने किनारपट्टीवरील गावांमध्ये समुद्राच्या मोठय़ा भरतीचे पाणी शिरत असे. पतन विभागाने शासनाच्या विकास निधीमधून तीन टप्प्यांमध्ये या बंधाऱ्याचे काम हाती घेतले आहे. मात्र उच्च भरतीच्या रेषेच्या ठिकाणी बंधारा बांधणे कठीण होत असल्याने अस्तित्वात असलेल्या जुन्या बंधाऱ्याच्या ठिकाणी नव्याने बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे जीर्ण झालेल्या दहा ते २५ किलो वजनाचे दगड बंधाऱ्याच्या  थरांमध्ये वापरण्यात येत आहेत.  त्यामुळे बंधाऱ्याची उभारणी जलद गतीने सुरू असल्याचे दिसून येते. जुन्या बंधाऱ्याच्या दगडाचा वापर केल्या गेल्याने त्या अनुषंगाने मंजूर बंधारापेक्षा अधिक लांबीचे बंधारा तयार करण्याचे निर्देश पतन विभागाने संबंधित ठेकेदारांना  दिले आहेत. जुना बंधाऱ्यातील सुमारे अडीच हजार घनमीटर दगडाचा पुनर्वापर झाल्याचा अंदाज पतन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

यापूर्वी मंजूर झालेल्या ८५ मीटरच्या बंधाराऐवजी ११० मीटरचा बंधारा उभारण्यात आला आहे.  तर ४७५ मिटर लांबीचा बंधारा उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत ५७५ मीटरच्या धूपप्रतिबंधक बंधाराचे काम पूर्ण झाले असून ८२५ मीटरच्या मंजूर बंधाऱ्याच्या लांबीत वाढ होऊन ती ९८० ते एक हजार मिटर लांबीच्या बंधाऱ्यांची उभारणी करणे आता शक्य होईल असे पतन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या बंधाऱ्याची उंची समुद्रसपाटीपासून आठ मीटर इतकी आहे,  असे सहाय्यक पतन अभियंता नीरज चोरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

तक्रार असूनही समाधान

जुना बंधाऱ्याची १० किलो पेक्षा कमी वजनाची दगडे नवीन बंधाऱ्यासाठी वापरण्यात येत आहेत.  असे करताना पतन विभागाने ग्रामस्थांना विश्वासात घेतले गेले नाही असे आरोप  करत या बंधाऱ्याचा दर्जा राखला जात नाही. बंधाऱ्याच्या कामावर विभागाकडून देखरेख ठेवली जात नाही अशी सातपाटीमधील ग्रामस्थांची  तक्रार आहे, असे असले तरी जलदगतीने होत असलेल्या बंधाऱ्याच्या कामामुळे यंदाच्या पावसाळ्यात समुद्राचे पाणी गावात शिरणार नाही, याबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.