लॉकडाउनच्या काळात रामायण, महाभारत मालिकांचं पुर्नप्रक्षेपण करण्यात यावं, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारनं या दोन्ही मालिकांबरोबरच शक्तीमान मालिका सुरू केली आहे. मालिकांच्या या यादीत आणखी भर पडणार असल्याचं दिसत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रामायण, महाभारतच्या समकालीन असलेल्या दोन मालिका प्रक्षेपित करण्याची मागणी केली आहे.

लॉकडाउनच्या काळात घरी बसून काय कराव असा प्रश्न पडलेल्यांसाठी ‘रामायण’ व ‘महाभारत’ या जुन्या मालिका पुन्हा एकदा टीव्हीवर दाखवल्या जात आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली. रामायण ही मालिका ऑन-एअर होताच या मालिकेने टीआरपीचे सारे विक्रम मोडीत काढले आहेत. २१५ पासून आतापर्यंत प्रसारित झालेल्या जनरल एंटरटेनमेंट कॅटगरीच्या (GEC) मालिकांतही रामायण मालिका सर्वोत्तम ठरली आहे.

दरम्यान, या मालिकांनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आणखी दोन मालिकांची नावं सुचवली आहेत. या मालिकाही प्रक्षेपित कराव्यात असं त्यांनी म्हटलं आहे. “जनतेला घरी थांबविण्याच्या उद्देशाने सरकारने रामायण, महाभारत आणि शक्तिमान या लोकप्रिय मालिका टीव्हीवर सुरू केल्या आहेत. याच मालिकांसोबत केंद्र सरकारने श्याम बेनेगल यांच्या लोकप्रिय ‘संविधान’ आणि ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या सुद्धा मालिका सुरू कराव्यात अशी विनंती मी केली आहे,” अशी माहिती चव्हाण यांनी ट्विट करून दिली.

दरम्यान, रामायण या जुन्या मालिकेसोबतच महाभारत, शक्तिमान, ब्योमकेश बक्षी, सर्कस, फौजी, श्रीमान श्रीमती या मालिकांचेही पुन:प्रक्षेपण केले जात आहे.