धवल कुलकर्णी

कुठल्याही राज्याची लोकसंख्या एक कोटीपेक्षा कमी आणि तीन कोटींपेक्षा अधिक असू नये. त्यामुळे महाराष्ट्राचे चार वेगळ्या राज्यांमध्ये विभाजन करावे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि तरुण भारतचे माजी संपादक मा गो वैद्य यांनी सांगितले. यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करून कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली.

“कुठलाही राज्याची लोकसंख्या हे तीन कोटींपेक्षा अधिक असू नये आणि एक कोटीपेक्षा कमी असू नये. त्यामुळे गोव्याचा महाराष्ट्रात समावेश करावा, तर पुद्दुचेरीचा तामिळनाडू मध्ये आणि दिव अाणी दमन गुजरात मध्ये. पूर्वांचल ची राज्य ही लहान असल्यामुळे त्यांचा यूरोप सारखा संघ करून त्यांचे राज्य बनवावे. महाराष्ट्रामध्ये चार वेगळ्या राज्यांची ची पुनर्रचना करता येईल नामे, गोव्यासह कोकण राज्य, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा. तसेच उत्तर प्रदेशही सहा राज्यांमध्ये विभागता येईल,” असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते असलेले वैद्य यांनी लोकसत्ता डॉट कॉम शी बोलताना सांगितले.

मुंबईचा समावेश कोकण राज्यांमध्ये करून त्याला कोकणची राजधानी घोषित करता येईल. त्याच प्रमाणे महाराष्ट्राची राजधानी पुणे, मराठवाड्याची औरंगाबाद, आणि विदर्भाची नागपूर होऊ शकेल. यामुळे उत्तम व्यवस्था आणि लोकांसाठी सोय निर्माण होईल.

वैद्य म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रचना सुद्धा याच पद्धतीने आहे उदाहरणार्थ संघाच्या देवगिरी प्रांतांमध्ये मराठवाडा आणि जळगाव आणि धुळे यांचा समावेश होतो. आपण ही भूमिका यापूर्वीसुद्धा मांडली असून या विषयावर साधारणपणे दहा वर्षांपूर्वी एक लेख लिहिला होता असे स्मरण त्यांनी सांगितले.