11 December 2017

News Flash

पारपत्र पडताळणीसाठी पोलीस अर्जदाराच्या घरी

‘एम पासपोर्ट’ पारपत्र प्रणाली कार्यान्वित

खास प्रतिनिधी, नाशिक | Updated: August 12, 2017 2:17 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

एम पासपोर्टपारपत्र प्रणाली कार्यान्वित

पारपत्र काढताना पोलीस पडताळणीसाठी अर्जदाराला पोलीस ठाण्यात माराव्या लागणाऱ्या फे ऱ्यांना आता पूर्णविराम मिळणार आहे. कारण, पडताळणीसाठी पोलीस कर्मचारी थेट अर्जदाराच्या घरी जाऊन छायाचित्रासह कागदपत्रे व इतर पडताळणी करणार आहेत. त्याची नोंदही लगेच भ्रमणध्वनी अॅपच्या माध्यमातून डिजिटल स्वरुपात होईल. प्रत्यक्ष कागदपत्रे बाळगणे व सांभाळणे यातून अर्जदार व पोलीस यांची सुटका होणार आहे.

‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी पोलिस आयुक्तालयात ‘एम पासपोर्ट’ या पारपत्र पडताळणी कार्यप्रणालीचे उद्घाटन आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते करण्यात आले. एम. पासपोर्ट हे अॅप असून शहरातील सर्वच्या सर्व म्हणजे १३ पोलीस ठाण्यांमध्ये ते उपलब्ध करून देण्यात आले आहे. पारपत्र काढू इच्छिणाऱ्याला वारंवार पोलीस ठाण्यात चकरा माराव्या लागतात. या सुविधेमुळे अर्जदाराची धावपळ टळणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी नमूद केले. महत्वाची बाब म्हणजे, पुणे व ठाणे पोलिसांनंतर राज्यात नाशिकमध्ये हे अॅप उपलब्ध झाले आहे. पारपत्र निरीक्षक भरत पराडकर यांनी या अॅपची निर्मिती केली. त्यासाठी लागणाऱ्या टॅबची व्यवस्था करण्यात आली आहे. ही प्रक्रिया डिजिटल झाल्यामुळे पडताळणीचा कालावधी कमी होऊन नागरिकांची गैरसोय टळेल. मोबाईल टॅबद्वारे हे संपूर्ण कामकाज चालणार असल्याने या प्रक्रियेत पारदर्शकता येईल. पडताळणीसाठी नागरिकांना पोलीस ठाण्यात येण्याची गरज भासणार नाही. कागदपत्रे व छायाचित्राचे स्कॅनिंग व अपलोड करण्याचे काम त्यांच्या निवासस्थानी होईल.

या उद्घाटन प्रसंगी उपायुक्त विजय मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधवी कांगणे यांच्यासह पारपत्र विषयक कामकाज करणारे कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर संबंधितांना हे अॅप वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ही सुविधा असलेले मोबाईल टॅब शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यास सिंगल यांच्या हस्ते देण्यात आले.

नागरिकांच्या वेळेची बचत

पारपत्र पडताळणीचे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्जदाराच्या निवासस्थानी जाणे बंधनकारक असते. त्याद्वारे पत्त्याची पडताळणी होते. मोबाईल टॅबद्वारे कमी मनुष्यबळात वेगाने काम होईल, असा विश्वास सिंगल यांनी व्यक्त केला. याद्वारे नागरिक व कर्मचाऱ्यांच्या वेळेची बचत होणार आहे.

 

First Published on August 12, 2017 2:13 am

Web Title: m passport system implemented in maharashtra