News Flash

मधुकर नेराळे यांना महाराष्ट्र सरकारचा जीवन गौरव पुरस्कार

नेराळे यांच्या तमाशा क्षेत्रातील कार्याचा राज्य सरकारकडून गौरव

संग्रहित छायाचित्र

राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारासाठी मधुकर पांडुरंग नेराळे यांची निवड करण्यात आली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा मंगळवारी केली. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पाच लाख रूपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, मालती इनामदार, अविष्कार मुळे, लता पुणेकर, दत्तोबा फुलसुंदर, विवेक कवठेकर, हेमसुवर्णा मिरजकर आणि जयमाला इनामदार या सदस्यांच्या समितीने नेराळे यांच्या नावाची निवड केली.

मधुकर पांडुरंग नेराळे यांचे वडिलोपार्जित तमाशा थिएटर आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून तमाशासोबत नेराळे यांची नाळ आपोआप जोडली गेली. मधुकर नेराळेंनी सुरूवातीच्या काळात पंडित राजारामजी शुक्ला यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. त्यांचे वडिलोपार्जित तमाशा थिएटर १९६५ पासून १९९४ पर्यंत होते. सन १९६९ साली स्वत:चे जसराज थिएटर स्थापन करून या संस्थेमार्फत ‘गाढवाचं लग्न’, ‘आतून किर्तन वरुन तमाशा’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘उदे गं अंबे उदे’, ‘एक नार चार बेजार’, ‘पुनवेची रात्र’, ‘काजळी’ या सारख्या वगनाटयांचे सादरीकरण करून भूमिका केल्या. त्यांनी मुंबई महाराष्ट्र, गोवा व दिल्ली येथे लोककलेचे व लावणीचे यशस्वी कला प्रदर्शन केले.

मधुकर नेराळे आणि मंडळी या कलापथकांचे दिल्ली, रायपूर, संबलपूर, भूवनेश्वर, कटक, जयपूर, जम्मू, पटना, दरभंगा, भागलपूर, रांची, बिलासपूर, नागपूर, गोरखपूर, जळगांव, भोपाळ या आकाशवाणी केंद्रावर व प्रत्यक्ष रंगमंचावर त्यांनी कार्यक्रम सादर केले. १९९५-९६ साली संगीत नाटक अकादमी तर्फे हिमाचल प्रदेशात त्यांनी लोककलेचे कार्यक्रम सादर केले.

१९९० ते १९९६ पर्यंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या तमाशा प्रशिक्षण शिबिराचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मुंबई लक्षद्विप दैनिक परिवार तर्फे समाज भूषण पुरस्कार, एकता कल्चरल अकादमी विरार तर्फे गुणगौरव पुरस्कार, दुरदर्शन मुंबई तर्फे कलारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तसेच लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्याबरोबर रंगमंचावर काम करण्याची त्यांना संधी लाभली. त्यांच्या याच योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांना सरकारने जीवन गौरव पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 9:44 pm

Web Title: madhukar nerale gets state government vithabai narayangaonkar lifetime achievement award
Next Stories
1 ‘विकासाच्या नावावर घरा-दारावर वरवंटा फिरवू नका’
2 गिरीश महाजन बंदूक घेऊन बिबट्याच्या मागावर; व्हिडिओ व्हायरल
3 अनिकेत कोथळेच्या भावांचा पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
Just Now!
X