राज्यात मुंबई, औरंगाबाद, नागपूर येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात अध्यादेश काढण्यास सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
औरंगाबाद येथे कोरोडीजवळ, त्याचप्रमाणे मुंबई येथे उत्तनजवळ आणि नागपूर येथेही विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात यापूर्वीच मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. या संदर्भातील विधेयकात सुधारणा करण्याचा प्रस्ताव डिसेंबर २०१३ च्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आला होता मात्र,या अधिवेशनात त्यावर चर्चा होऊ शकली नव्हती. हे विद्यापीठ २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यासाठी अध्यादेश काढणे आवश्यक होते, त्यामुळे तसा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कुलगुरु तसेच इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे,विविध प्राधिकरणे निर्माण करणे,प्रवेश प्रक्रिया सुरु करणे शक्य होणार आहे.