राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुणे विमानतळावर पोहोचले होते. थोडया वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर आगमन झाले. राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते .

पुण्यात आजपासून देशातील पोलिस महासंचालकांची परिषद सुरू झाली आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत. गृहमंत्री अमित शाह हे आधीच पुण्यात दाखल झाले आहेत. भाजपा-शिवसेना युती तुटल्यानंतर मोदी आणि ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे.

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक महायुतीने एकत्र लढवली होती. पण मुख्यमंत्रिपदावरुन फिसकटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपावर विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. उद्धव ठाकरे यांनी मागच्या आठवडयात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. राज्याच्या विकासासाठी उद्धव ठाकरे प्रचंड मेहनत घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती.