करोना आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन राज्य सरकारनं शाळा बंद ठेवत ऑनलाईन शैक्षणिक सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. चार ते पाच महिने लोटल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागानं २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी इयत्तेचे शाळेत वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याची नोंद झाल्यानंतर अनेक ठिकाणी शाळा उघडण्याचा निर्णय लांबण्याची शक्यता आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा असल्याचं सांगत शिक्षणमंत्र्यांनी तसे संकेतही दिले आहेत.

राज्यात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वीच मुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्या आदेशानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबद्दल ट्विट करून अधिक माहिती दिली आहे. यात जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतरच शाळा सुरू करण्यात येतील, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

“महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. करोना प्रभावित जिल्ह्यातील शाळा सुरू करताना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, शिक्षण अधिकाऱ्यांनी विचारविनिमय करून विद्यार्थ्यांचे आरोग्य, शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा. शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा आहे,” असं शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

“यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्गासोबतच ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. करोना महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.